सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी नगर पालिकेत सफाई कामगार असलेला व वाजंत्री म्हणून लग्न समारंभात वाद्य वाजवणारा अनिकेत मनोज मोगरे (२२) रा. सेवा नगर हा सिद्धिविनायक मंगल कार्यालयातील एका लग्नसमारंभात वाद्य वाजविण्याकरिता गेला होता. लग्नातील वाद्य वाजवून झाल्यानंतर तो मंगलकार्यालयाजवळ उभा असतांना दुपारी ३ वाजता हरीश संजय रायपुरे (२१) व अमोल अरोलवार दोन्ही रा. दामले फैल त्याठिकाणी आले. दोन महिन्यापूर्वी दुचाकी लावण्यावरून झालेला वाद उकरून काढत त्यांनी अनिकेत मोगरे याच्याही वाद घालत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. दोन महिन्यापूर्वी एका लॉन जवळ दुचाकी लावण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. काल अनिकेत मोगरे समोर दिसताच हरीश रायपुरे व अमोल अरोलवार या दोघांनी त्याच्यावर हल्ला चढवला. हाताबुक्क्यांनी मारहाण करण्याबरोबरच त्याच्यावर चाकूचेही वार करण्यात आले. अनिकेत मोगरे याने कशीबशी त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करित पोलिस स्टेशन गाठले. हल्लेखोरही त्याच्या मागोमाग पोलिस स्टेशनला आले, व पोलिस स्टेशनच्या आवारातच त्याला मारहाण करू लागले. पोलिसांनी प्रसंगावधान राखून वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी चाकू हल्ला करणाऱ्या हरीश रायपुरे व अमोल अरोलवार या दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर भादंवि च्या कलम ३०७, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.
नगर परिषदेच्या सफाई कामगारावर दिवसाढवळ्या चाकू हल्ला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 08, 2022
Rating:
