स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळतांना निर्माण होऊ लागल्या आहेत अनेक अडचणी


सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे

वणी : गरीब लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य खरेदी करतांना मोठ्या अडचणी येऊ लागल्या आहेत. रेशनकार्ड धारकांना धान्य खरेदी करण्याकरिता स्वस्त धान्य दुकानाच्या चकरा माराव्या लागत असल्याने ते कमालीचे वैतागले आहेत. कधी धान्य उपलब्ध नसते, तर कधी तांत्रिक बिघाड व सरवर डाऊन राहत असल्याने लाभार्थ्यांना आल्यापावली परत फिरावे लागत आहे. धान्य मिळण्याचा कोणताही ठरलेला कालावधी नसल्याने मजुरी बुडवून दूर वरून धान्य मिळण्याच्या आशेने येणारे मजुरही धान्याच्या उप्लब्धतेअभावी हताश होऊन परत जातात. बहुतांश स्वस्त धान्य दुकाने राहुटी वस्त्यांपासून २ ते ३ किमी अंतरावर असल्याने लाभार्थ्यांना धान्याच्या किमती पेक्षा घरापर्यंत धान्य नेण्याचा खर्च जास्त उचलावा लागत आहे. धान्य मिळण्याचा वेळ व काळ निश्चित नसल्याने मजूरवर्ग स्वस्त धान्य दुकानाच्या चकरा मारून थकतो, व नंतर धान्य मिळण्यापासूनच वंचित रहातो. मोफत धान्य मिळण्याचाही कालावधी निश्चित नसल्याने कित्येकांना अनाजा पासून वंचित रहावे लागले. रेशनकार्डवर मिळणाऱ्या धान्यावर अनेक गरीब गरजू लोकांची उपजीविका चालते. स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य हे गरिबांच्या जगण्याचा आधार असतांना त्यांना याच धान्यापासून वंचित रहावे लागत असल्याने त्यांच्या समोर मोठ्या अडचणी निर्माण होऊ लागल्या आहे. धान्य खरेदी ऑन लाईन झाल्याने ग्राहकांचे ईपीओएस मशीनवर फिंगर मॅच झाल्यानंतरच त्यांना अनाज मिळते. परंतु नेटवर्कच्या समस्येमुळे व तांत्रिक अडचणींमुळे ही मशीन काम करत नसल्याने लाभार्थ्यांना धान्य प्राप्त करतांना मोठा त्रास सहन करावा लागत असून तासंतास रांगेत ताटकळत उभे रहावे लागत आहे. मागील काही दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानातील ई-पास मशीन सातत्याने बंद पडत आहेत. या ई-पास मशीन टूजी नेटवर्कच्या असल्याने नेटवर्कच्या समस्येमुळे या मशीन काम करीत नाही. त्यामुळे मशीनवर नागरिकांचे थंब घेणे शक्य होत नसल्याने लाभार्थ्यांना ई-पास मशीन ऍक्टिव्ह होईस्तोर धान्य मिळत नाही. परिणामी त्यांना स्वस्त धान्य दुकानाच्या चकरा माराव्या लागत असल्याने त्यांचा मोठा मनस्ताप होत आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने सर्व्हर डाऊन रहात असल्याने रेशकार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानांची नुसती पायपीट करावी लागत आहे. फेब्रुवारी महिना हा २८ दिवसांचाच असल्याने व सातत्याने ई-पास मशीन बंदची समस्या उद्भवल्याने लाभार्थ्यांना अनाज खरेदी करिता काही दिवस वाढवून मिळतील काय, हा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जाऊ लागला आहे. सर्व्हर डाऊनमुळे दुपारी ३ वाजतानंतर धान्य वाटपाला सुरुवात होत असल्याने बऱ्याचशा लाभार्थ्यांना अद्याप धान्य मिळालेले नाही. उद्याची शेवटची तारीख असल्याने अनेक लाभार्थी धान्य मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ई-पास मशीन बंदची समस्या दूर होई पर्यंत रेशनकार्ड धारकांना धान्य खरेदी करण्याकरिता समोर काही दिवस वाढवून देणे गरजेचे झाले आहे.
स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळतांना निर्माण होऊ लागल्या आहेत अनेक अडचणी स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळतांना निर्माण होऊ लागल्या आहेत अनेक अडचणी Reviewed by सह्याद्री चौफेर on February 27, 2022 Rating: 5
Powered by Blogger.