सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : ताडोबा बफर झोन क्षेत्रांतर्गत असणाऱ्या गावांमधील नागरिकांना क्षेत्र संचालक गुरुप्रसाद व वनविभागाचे अधिकारी कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अडकवून अमानवीय अन्याय अत्याचार करीत आहेत. दलित व आदिवासी शेतकरी व युवकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून मारझोड करणे, धमकावणे, अत्यंत हीन वागणूक देणे असा प्रकार गुरुप्रसाद यांच्या सांगण्यावरून या क्षेत्रात मागील दोन वर्षापासून घडत आहे. उपराेक्त अन्याय व अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी राजु झोडे हे सातत्याने दलित व आदिवासी यांच्या बाजूने लढा देत आहेत. ह्याच गोष्टीचा राग ठेवून वनविभागाने त्यांच्यावर हास्यास्पद व लज्जास्पद असा आरोप करण्याचा प्रयत्न करीत आहे. राजू झोडे व ताडोबा क्षेत्रातील दलित, आदिवासी व इतर पारंपारिक शेतकरी यांचा लढा कमजोर करण्याचा प्रयत्न वनविभागाकडून होताना आता दिसू लागला आहे. झोडे यांनी वाघाच्या शिकारीसाठी फासे टाकल्याच्या आरोपा वरून गुन्हा दाखल करून दि. ७ जानेवारी २०२२ ला मूल येथे वन विभाग कार्यालयात बयान घेण्यासाठी बोलाविले होते. येत्या १२ तारखेला वन विभागाच्या हुकूमशाही, बेबंदशाही, अन्याय तथा अत्याचारा विरोधात आदिवासी व दलित या शिवाय अन्यायग्रस्त जनतेचा आक्रोश मोर्चा मूल येथे आयोजित केला आहे. सदरहु आक्रोश मोर्चाला दाबण्याच्या प्रयत्नात वनविभाग असून खोटे आरोपात अडकवण्याचा प्रयत्न गुरुप्रसाद यांच्या इशाऱ्यावरून वन विभाग करीत आहे.
या विभागाच्या जनविरोधी निरंकुश व हुकूमशाही वृत्तीचा विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण आदिवासी व दलित व इतर अन्यायग्रस्त नागरिकांनी आक्रोश मोर्चात सामील होऊन अन्याय अत्याचार करणाऱ्या गुरुप्रसाद व त्यांच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी या साठी माेठ्या संख्येने मोर्चाला उपस्थित राहावे असे आवाहन राजु झोडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे. येत्या १३ तारखेला वन विभागाने पुन्हा बयानासाठी बोलविले असून नाहक त्रास देऊन खोट्या गुन्ह्यात अडकवून आक्रोश आंदोलन दडपण्याचा प्रयत्न वनविभाग करीत आहे. या विरोधात वंचित बहुजन आघाडी, गोंडवाना गणतंत्र पार्टी, उलगुलान कामगार संघटना, भूमिपुत्र ब्रिगेड तसेच इतर सामाजिक संघटना येत्या १२ तारखेच्या आक्रोश मोर्चात सहभागी होणार असल्याचे राजू झाेडे यांनी सांगितले.
वनविभागाच्या दडपशाहीला न जुमानता हा लढा सुरूच राहणार - राजु झोडे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 08, 2022
Rating:
