कवितेचा जन्म संवेदनेतून होतो - प्रा. दिलीप अलोणे

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : मनुष्याच्या जाणिवा नेणिवेपर्यंत पोहचतात तेव्हा मन विव्हळतं. त्यावेळी व्यक्तींमध्ये असलेल्या प्रतिभेतून जे व्यक्त होते ती कविता होय. संवेदनशील मन असल्याशिवाय कवितेचा जन्मच होत नाही. कवितेचा जन्म संवेदनेतून होतो. असे प्रतिपादन विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे अध्यक्ष डॉ. प्रा. दिलीप अलोणे यांनी केले. ते नगर वाचनालयात आयोजित 'कवी कट्टा' या कविता सादरीकरणाच्या कार्यक्रमात बोलत होते. या कवी कट्ट्याचे हे प्रथम पुष्प प्रसिद्ध जेष्ठ गीतकार स्व. गौतम सुत्रावे यांच्या स्मृतीला अर्पण करण्यात आले.  

नगर वाचनालय व विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मासिक कवी कट्ट्याचा उपक्रम 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. दिलीप अलोणे हे होते. प्रथम पुष्पात कवितांचे सादरीकरण करण्यासाठी माजी गटशिक्षणाधिकारी उत्तमराव गेडाम व नगर वाचनालयाच्या संचालिका प्राची पाथ्रडकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार यांनी केले. त्यात त्यांनी स्वरचित एक व इतर कविता सादर करून कवी कट्ट्याची पार्श्वभूमी विशद केली. 
        
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विदर्भ साहित्य संघाचे भूतपूर्व कार्यध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश विजय देशमुख यांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांना मूक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उत्तमराव गेडाम यांनी शाबास, वेदनेचा गोलार्ध, आदिवासी पुन्हा जागा झाला, शांती की राह पर, जीवन या त्यांच्या पाच सर्वोत्तम कविता सादर केल्या. प्राची पाथ्रडकर यांनी सावित्री, हाडाचे सापळे, कापूस कोंड्याची गोष्ट, त्याची चिता पेटविती ठेवली. या सर्वोत्कृष्ट कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.
         
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. आभार राजेश महाकुलकार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार यांनी परिश्रम घेतले.
कवितेचा जन्म संवेदनेतून होतो - प्रा. दिलीप अलोणे कवितेचा जन्म संवेदनेतून होतो - प्रा. दिलीप अलोणे Reviewed by सह्याद्री चौफेर on January 05, 2022 Rating: 5
Powered by Blogger.