पुन्हा बरसला अवकाळी पाऊस...शहरात अचानक कोसळलेल्या पावसाने उडविली नागरिकांची तारांबळ

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : अवकाळी पावसाने काल आणखी शहराला झोडपले. शहरासह तालुक्यात अवकाळी जलधारा बरसल्या. शहरात सकाळ पासूनच ढगाळी वातावरण होते. सायंकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता पावसाचा जोर वाढला, व अर्धा तास मुसळधार पाऊस पडला. रविवार बाजाराचा दिवस असल्याने खरेदी करणाऱ्या नागरिकांची अचानक आलेल्या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. पावसात भिजू नये म्हणून नागरिक मिळेल तो आसरा शोधत धावपळ करू लागले. अवकाळी पावसाचा आता काही नेमच राहिला नसल्याचे नागरिक संतापाच्या भरात बोलत होते. हवामान खात्याचे अवकाळी पावसाचे अंदाज पूर्णतः खरे ठरत असून सांगितलेल्या काळात पाऊस न चुकता हजेरी लावत आहे. या अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे कास्तकारांचे मात्र प्रचंड नुकसान होत आहे. शेतमालाची या अवेळी पडणाऱ्या पावसामुळे मोठी नासाडी होत आहे. नापिकीमुळे आधीच डबघाईस आलेला कास्तकार थोड्याफार हातात आलेल्या मालालाही मुकू लागला आहे. अवकाळी कोसळणारा पाऊस व त्यात पडणाऱ्या गारपिटीमुळे कास्तकारांची मोठी त्रेधातिरपीट होऊ लागली आहे. अती पावसामुळे शेतमालाचं प्रचंड नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागण्याही होऊ लागल्या आहे. निसर्गचक्र बदलल्याचं चित्र मागिल दोन वर्षांपासून पाहायला मिळत आहे. पाऊस व कोरोना कधी लय पकडेल याचा काही नेमच राहिलेला नाही.  

अवकाळी पावसाने काल ९ जानेवारीला शरासह तालुक्यात दमदार हजेरी लावली. आज १० जानेवारीलाही सकाळी पावसाची रीप रीप सुरुच होती. ढगाळ वातावरणामुळे उजाडलेला दिवसही बुडाल्यागत वाटत होता. नोकरी कामावर जाणाऱ्या लोकांना आज स्वेटर, जॅकेट ऐवजी रेनकोट घालावे लागले. मौसम कधी रंग बदलेल हे आता सांगताच येत नाही. वातावरणात अचानक होणाऱ्या बदलामुळे नागरिकांच्या प्रकृतीतही फरक पडून त्यांच्यात सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे निर्माण होतात. अवेळी पडणाऱ्या पावसामुळे कास्तकारही चांगलेच अडचणीत आले आहे. बेमौसम पावसामुळे शेतमालाचं मोठं नुकसान झालं आहे. हातात आलेलं थोडंफार पीकही अवकाळी पावसाला बळी चढलं आहे. ओल्या दुष्काळामुळे कास्तकार पार देशोधडीला आला आहे. अवकाळी पाऊस नुकसान व रोगराईचं कारण बनू लागल्याने आता पाऊस नको रे, म्हणण्याची नागरिकांवर वेळ आली आहे.
पुन्हा बरसला अवकाळी पाऊस...शहरात अचानक कोसळलेल्या पावसाने उडविली नागरिकांची तारांबळ पुन्हा बरसला अवकाळी पाऊस...शहरात अचानक कोसळलेल्या पावसाने उडविली नागरिकांची तारांबळ Reviewed by सह्याद्री चौफेर on January 10, 2022 Rating: 5
Powered by Blogger.