कमलापूरच्या हत्तीचे स्थानांतर नाही तर, या जिल्ह्याच्या अस्मितेचा प्रश्न - जनतेनी लाेकलढा उभारावा कुसुमताई अलाम यांचे आवाहन
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल असलेल्या जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमलापूर येथील हत्तीचे स्थानांतरण होऊ नये यासाठी अनेक संस्था, संघटना व प्रामुख्याने काँग्रेस पक्ष पुढे सरसावला आहे. हे अपेक्षितही आहे. महाराष्ट्रातील एकमेव कमलापूरच्या कँप मधील हत्तींचे स्थानांतरण करून गुजरातच्या रिलायन्स इंडस्ट्रीज तर्फे उभारल्या जाणाऱ्या प्राणी संग्रहालयात त्याची रवानगी करण्यात येणार असल्याचे हालचाली सुरू झाल्या त्यामुळे मुक्त फिरणाऱ्या व निःशुल्क पाहता येणाऱ्या या हत्तींना पैसे कमवण्यासाठी प्राणी संग्रहालयात नेण्यात येऊन तिकीटे लावली जाईल हे निदर्शनास आल्याने ही रास्त मागणी केली जात आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली अशी या जिल्ह्याची सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे. गडचिरोली हे नाव केवळ नक्षलवादी, कुपोषण व व्यसन असे न राहता भरपूर निसर्ग सौंदर्य, वनसंपदा,पर्यावरण, व सांस्कृतिक ओळख असलेला आहे यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काही चांगला बदल व्हावा,सन्मानाने हे नाव भारतात घेतले जावे यासाठी या सर्वांनी मिळून प्रयत्न सुरू केले आहे ही अभिमानास्पद बाब आहे. वन व वन्य जीव हे मानवी विकासात महत्त्वाचे घटक आहेत. कोविड काळात पर्यावरणीय ऱ्हासाचे दुष्परिणाम जगाने भोगले आहे. विकासाच्या नावाखाली दिशाभूल करणारी विध्वंसक प्रक्रिया व त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रणासाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे. डोंगरांचे सपाटीकरण, नद्यांना अडवून बांध, धरणे, जंगलतोड, यामुळे मानवी जीवन व वन्य जीव उध्वस्त होत आहे अशावेळी गडचिरोलीत होत असलेल्या या आंदोलनाकडे केवळ काही हत्तीसाठीचे हे न राहता जिल्ह्याचा लौकिकात भर घालणारी प्रक्रिया आहे हे समजले पाहिजे. या जिल्ह्याच्या नावावर अनेक आंदोलने आहेत.
जिल्हा निर्मिती पासुनच नव्हे तर पूर्वीपासून येथे आंदोलने करण्यात आली. ते वीर बाबुराव शेडमाके यांचे इंग्रजांविरुद्धचे आंदोलन असेल, क्रांतीवीर नारायण सिंह ऊईके यांचे जबरानजोत, बाबुरावजी मडावी यांचे गडचिरोली जिल्हा निर्माणासाठी,राजे विश्वेश्वर राव आत्राम यांचे वेगळ्या विदर्भाचे,दारुबंदीचे,व अलिकडे खदान व नैसर्गिक संसाधन वाचवण्यासाठी युध्द पातळीवर आंदोलने सुरू आहेत. कमलापूरचे आंदोलन करण्यात येत आहे ते केवळ हत्तीचे स्थलांतर नाही. तर या जिल्ह्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. यासाठी लोकलढा उभारला गेला पाहिजे.
जनतेने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन गडचिराेलीच्या सामाजिक कार्यकर्त्या कुसुम ताई अलाम यांनी केले आहे.
कमलापूरच्या हत्तीचे स्थानांतर नाही तर, या जिल्ह्याच्या अस्मितेचा प्रश्न - जनतेनी लाेकलढा उभारावा कुसुमताई अलाम यांचे आवाहन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 16, 2022
Rating:
