सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी : "प्रामाणिकपणे मिळणारा पर्याप्त पैसा, कायमस्वरूपी सुरक्षा, हवाहवासा सन्मान, कार्यसाधक सत्ता किंवा अधिकार या सर्व गोष्टी स्पर्धा परीक्षेच्या यशासोबत आपल्याला आपोआप मिळतील मात्र त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे मिळेल देशसेवेची संधी. स्वच्छ आणि कार्यक्षम जीवन जगत, हाती घेतलेले कार्य सुंदर रितीने करणे हीच देश आणि ईशसेवा आहे. ती करण्यासाठी कृत संकल्प असलेला कार्यकर्ता अधिकारी होणे हे या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकाचे ध्येय असायला हवे." असे प्रेरक विचार माजी सनदी अधिकारी तथा चाणक्य परिवारचे सर्वेसर्वा डॉ. अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणीच्या विद्यार्थ्यांना, सिनर्जी या अभिनव उपक्रमात आभासी पद्धतीने, "स्पर्धा परीक्षा आणि करिअरच्या संधी" या विषयावर ते मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी अशा विद्यार्थी हिताला देशहित माणणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या मार्गदर्शनाद्वारे आपल्या महाविद्यालयातून यशस्वी सनदी अधिकारी निर्माण व्हावेत ही आशा व्यक्त केली.
नमस्ते, सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा आणि प्रार्थना अशा त्रिसूत्रीच्या आधारे आपल्या विवेचनाचा आरंभ करणाऱ्या डॉ. धर्माधिकारी यांनी लोकमान्य टिळकांच्या कथेच्या द्वारे सर्वच करियर आपापल्या स्थानी श्रेष्ठ असल्याचे सांगून नवीन तंत्रज्ञानाने आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या सुविधां बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कोणत्याही क्षेत्रात आता स्पर्धा परीक्षेला पर्याय नाही हे अधोरेखित करीत प्राथमिक परीक्षेत आपले माहिती वरील प्रभुत्व, मुख्य परीक्षेत आपले ज्ञानावरील प्रभुत्व तर मौखिक परीक्षेत आपल्या व्यक्तिमत्त्वाची तपासणी केली जाते असे सांगत स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी ? इथपासून तर मुलाखतीत कसे वागावे? बोलावे? इतपर्यंत अनेक पैलूंना सोदाहरण स्पष्ट केले.
अत्यंत अभ्यासपूर्ण तरीही सहज, सुलभ, प्रेमपूर्ण आणि कळकळ युक्त अशा या संवादाने उपस्थितीचे सर्व विक्रम मोडले हे विशेष उल्लेखनीय.
अध्यक्षीय मनोगतामध्ये नरेंद्र नगरवाला यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इतक्या लहान आणि सुदूरस्थित महाविद्यालयात इतकी मोठी व्यक्तिमत्वे येऊ शकतात याचा आनंद व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास मंडळाचे संयोजक डॉ.अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. महादेव भुजाडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ गुलशन कुथे, डॉ.परेश पटेल,पंकज सोनटक्के यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यकर्ता अधिकारी होण्याचे ध्येय असावे - डॉ. अविनाश धर्माधिकारी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 02, 2022
Rating:
