माणसाला माणूस जोडला की उत्तरे मिळतात - सारंग गोसावी

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी :  " वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमधून रंगविल्या जाते किंवा समाज माध्यमातून पसरवल्या जाते तसे, दगडफेक, सैन्यविरोध, आतंकवाद एवढेच काश्मीरचे वास्तव नसून येथील सामान्य माणूस मनाने भारताशीच जोडलेला आहे. तो नित्य अडचणींशी झगडत आहे. आपला अविश्वास त्याला अधिक त्रास देणारा आहे. आपल्यापैकी जो कोणी तेथे जाऊन त्यांच्या जगण्याला सुसह्य करण्यासाठी प्रयत्न करतो त्या प्रत्येकाला तेथे प्रचंड प्रेम मिळते. हाताला काम आणि डोक्याला शिक्षण अशा स्वरूपात त्या सामान्य माणसाला सहकार्य करत माणसाला माणूस जोडला तरच काश्मीर प्रश्न खऱ्या अर्थाने हाताळता येईल. राजकीय भूमिका आपल्या जागी आवश्यक कार्य करीत असती तरी आपल्या सगळ्यांना मानव संधानाचे हे कार्य निष्ठेने करायला हवे." असे विचार असीम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सारंग गोसावी यांनी व्यक्त केले.
   
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या लोकनायक बापूजी आणि स्मृती व्याख्यानमालेच्या ५२ व्या वर्षी "काश्मीर प्रश्नी तरुणांचे योगदान एक असीम यात्रा !" या विषयावर आयोजित आभासी व्याख्यानात ते व्यक्त होत होते. 
     
याप्रसंगी संस्थेचे सचिव एड. लक्ष्मणराव भेदी अध्यक्षस्थानी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी सकारात्मक विचार आणि सुयोग्य नियोजन यांच्या आधारे किती सुंदर कार्य उभे करता येते? याचा वस्तुपाठ सारंग गोसावी यांच्या कार्यातून प्राप्त होतो हे अधोरेखित केले.
    
आपल्या अत्यंत संयमित, अनुभवाधिष्ठित निवेदनात सारंग गोसावी यांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी काश्मीर मध्ये जाण्याचा निर्णय, त्यामागील प्रेरणा, तेथे गेल्यानंतर आलेले अनेक अनुभव, केलेले शैक्षणिक कार्य, बेकरींचे उभे केलेले जाळे, सामान्य माणसाची मिळणारी साथ, क्रिकेटच्या माध्यमातून सैन्य आणि नागरिक यांच्यात साधलेला दुवा, सेना अधिकाऱ्यांकडून मिळालेली अनमोल शाबासकी अशा अनेक गोष्टी उघडून दाखवत, उरी म्हणजे केवळ सर्जिकल स्ट्राइक नव्हे तर राष्ट्रीय भावनेने भारतासोबत भक्कमपणे उभे असलेले गाव ही ओळख जनमानसात व्हायला हवी असे कळकळीचे आवाहन केले.
   
संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला यांनी प्रकृती अस्वास्थ्य असूनदेखील कार्यक्रमात सहभागी होऊन सारंग गोसावी यांना वणीचे प्रत्यक्ष आमंत्रण दिले. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणराव भेदी यांनी सारंग गोसावी यांचे काम प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे हे अधोरेखित करीत त्यांना आवश्यक ती प्रत्येक मदत देण्याचे अभिवचन दिले.
  
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे सहसचिव अशोक सोनटक्के यांनी केले.
कार्यक्रमाच्या तांत्रिक यशस्वीतेसाठी डॉ. गुलशन कुथे, डॉ. परेश पटेल जयंत त्रिवेदी तथा पंकज सोनटक्के इ. नी विशेष परिश्रम घेतले.
माणसाला माणूस जोडला की उत्तरे मिळतात - सारंग गोसावी माणसाला माणूस जोडला की उत्तरे मिळतात - सारंग गोसावी Reviewed by सह्याद्री चौफेर on January 27, 2022 Rating: 5
Powered by Blogger.