शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन भाजपचे गाव तिथं आंदोलन, ४ फेब्रुवारी पासून आंदोलनाला होणार सुरुवात

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे मोठे नुकसान होऊनही तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई पासून वंचित ठेवले. शिंदोला व पुनवट या मंडळांचा अतिवृष्टीग्रस्त मंडळामध्ये समावेशच करण्यात आलेला नाही. आस्मानी संकटात शेतकरी पूर्णतः भरडला गेला असतांनाही शासन शेतकऱ्यांना मदत देण्यास टाळाटाळ करीत आहे. आधी निसर्गाच्या लहरीपणामुळे व नंतर अतिवृष्टीमुळे शेत पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी देशोधडीला आला आहे. हातातोंडाशी आलेली पिकंही अतिवृष्टीमुळे हिरावली गेल्याने शेतकरी पुरता हादरला आहे. त्यांना मदतीचा हात देण्याऐवजी शासन कृषी पंपाची वीज कापून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या व समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता भारतीय जनता पार्टी ४ फेब्रुवारी पासून वणी विधानसभा क्षेत्रात गाव तेथे आंदोलन करणार असल्याची माहिती आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

तालुक्यात ऑगष्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकांचं मोठं नुकसान होऊन शेतकरी चांगलाच आर्थिक अडचणीत आला आहे. हातातोंडाशी आलेली पिकंही अतिवृष्टीने हिरावून घेतली. आस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आता सुलतानी संकटांचाही सामना करावा लागत आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई तर मिळालीच नाही, उलट कृषी पंपाची वीज कापून शासन शेतकऱ्यांवर कहर ढाळत आहे. रब्बी पिकांच्या हंगामात थकबाकी वीज बिलाचं कारण समोर करून जबरन कृषी पंपाची विज कापली जात आहे. शेतात चणा व गहू ही पिकं डौलावर असतांना वीज वितरण कंपनी कृषी पंपाची वीज कापत असल्याने शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन ओलीताच्या वेळेलाच शेतातील कृषी पंपाची वीज कापली जात असल्याने पिकं करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. अतिवृष्टीमुळे आधीच संकटात आलेल्या शेतकऱ्यांसमोर विद्युत विभाग आणखी संकटं निर्माण करू लागला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी शासन अन्यायकारक भूमिका घेऊ लागल्याने भाजप शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहून शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविणार आहे. ३० नोव्हेंबरला भाजपच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत शासनाला शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत निवेदन पाठविले होते. पण निवेदनाची दखलच घेण्यात न आल्याने भाजपच्या वतीने आता वणी विधानसभा क्षेत्रात गाव तिथं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ४ फेब्रुवारी पासून गावागावात आंदोलन करून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची विज कापण्यात येऊ नये, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील ९ मंडळामध्ये शिंदोला व पुनवट या मंडळाचा समावेश करणे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देणे, कृषी पंपाचे भारनियमन रद्द करणे या मागण्याचा समावेश आहे. वणी, मोरगाव व झरी या तीनही तालुक्यात गाव तिथं आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपचे विजय पिदूरकर, दिनकरराव पावडे, तारेंद्र बोर्डे, रवि बेलुरकर, संजय पिंपळशेंडे, गजानन विधाते, श्रीकांत पोटदुखे, बंडू चांदेकर, शंकर बांदूरकर उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन भाजपचे गाव तिथं आंदोलन, ४ फेब्रुवारी पासून आंदोलनाला होणार सुरुवात शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन भाजपचे गाव तिथं आंदोलन, ४ फेब्रुवारी पासून आंदोलनाला होणार सुरुवात Reviewed by सह्याद्री चौफेर on January 27, 2022 Rating: 5
Powered by Blogger.