आदिवासी युवकांना वन विभागाच्या कर्मचा-यांची बेदम मारहाण


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : ताडोबा बफर झोन अंतर्गत मूल तालुक्यातील फुलझरी व डोनी या गावातील आदिवासी युवक फुलझरी वरून डोनीला जात असताना अचानक त्यांची गाडी खराब झाली. त्यामध्ये आशिष नैताम, भारत कोवे, मनोज मरापे हे तिघे आदिवासी युवक होते. भारत कोवे हा पायदळ वाटेत जात असताना अचानक वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना ३० डिसेंबरला घडली व सदरहु प्रकरण ३१ डिसेंबरला उघडकीस आले.
         
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान वनक्षेत्र संचालक गुरुप्रसाद यांच्या सांगण्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर व उपक्षेत्र अधिकारी धुर्वे, त्यांचे अन्य अधिकारी व कर्मचारी फुलझरी व डोनी येथील युवकांना रात्री घरात घुसून व त्यांना उचलून जबरदस्तीने ओढत नेऊन गाडीत कोंबले व त्यांना जंगलात नेऊन तुम्हीच भारत कोवे या युवकाचा खून केला असे बयान पोलिसांना द्या ! अशी जबरदस्ती केली व अमानुषपणे मारहाण केली. वाघाचा हल्ला केल्याची घटना दाबून टाकण्यासाठी क्षेत्र संचालक गुरुप्रसाद यांच्या इशाऱ्यावरून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बेदम अमानुष मारहाण केली. गावकऱ्यांनी सदरहु प्रकरण उचलून धरताच प्रकरण वन विभागाच्या व आपल्या अंगलट येईल असा प्रकार दिसताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आदिवासी युवकांच्या घरी जाऊन हात पाय जोडून प्रकरण मागे घेण्याची विनवणी केली. केस मागे न घेतल्यास गावकऱ्यांना व आदिवासी शेतकऱ्यांना शासनाच्या दिलेल्या जमिनी परत घेऊन वन कायद्याअंतर्गत गावकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात आम्ही अटकवू शकतो अशा अनेक धमक्या देखिल उपक्षेत्र संचालक गुरुप्रसाद यांच्या इशाऱ्यावरून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदिवासींना व गावकऱ्यांना सातत्याने देत आहेत. उपरोक्त घटनेची बातमी गावकऱ्यांनी उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु झोडे यांना कळविताच त्यांनी डोनी व फुलझरी या गावांना भेट दिली व दुसऱ्याच दिवशी जिल्हा कचेरीवर संपूर्ण गावकऱ्यांना घेऊन न्याय मिळवण्यासाठी निवेदन दिले. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रकार करणाऱ्या व अमानुष मारहाण करणांऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी एका निवेदनात केली सदरहु प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत गावकरी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा जिल्हा प्रशासनाला देण्यात आला. जर मागणी तात्काळ पूर्ण झाली नाही तर उलगुलान कामगार संघटना व गोंडवाना गणतंत्र पार्टी तीव्र आंदोलन करणार असा इशारा सुध्दा देण्यात आला. जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोज आत्राम, डोनी येथील उपसरपंच विकास कुडमेथे, जितेंद्र बोरुले, आशिष नैताम, संपत कोरडे, गौतम गेडाम तथा अन्य गावकरी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी युवकांना वन विभागाच्या कर्मचा-यांची बेदम मारहाण आदिवासी युवकांना वन विभागाच्या कर्मचा-यांची बेदम मारहाण Reviewed by सह्याद्री चौफेर on January 03, 2022 Rating: 5
Powered by Blogger.