रेल्वेच्या हद्दीतील घरे हटविल्यास त्यांच्या पुनर्वसनाकरिता जागा उपलब्ध करून द्यावी, राजूर ग्रामपंचायतेची मागणी
सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
राजूर कॉलरी येथील नागरिक अनेक वर्षांपासून रेल्वे विभागाच्या हद्दीतील जागेत घरे बांधून रहात आहे. मिळेल ती कामे करून ते याठिकाणी वास्तव्य करतात. रोज मजुरीतून पैशाची बचत करून त्यांनी रेल्वेच्या हद्दीतील खुल्या जागेवर निवारे बांधली आहेत. राजूर येथील वार्ड क्रमांक ३ व वार्ड क्रमांक ४ मधील बहुतांश घरे रेल्वे विभागाच्या हद्दीत येत असल्याने या घरांवर बुलडोजर चालविण्याच्या रेल्वे विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. दोन्ही वार्डातील जवळपास ३०० ते ४०० घरं रेल्वेच्या जागेवर बांधण्यात आली असून रेल्वे विभागाने ही घरं हटविल्यास अनेक जण बेघर होऊन त्यांचे संसार उघड्यावर येतील. एवढ्या घरांचे पुनर्वसन करण्याकरिता ग्रामपंचायतेकडे तेवढी जागाच उपलब्ध नाही. हातावर आणून पानावर खाणारी गरीब जनता याठिकाणी वास्तव्यास आहे. त्यांना त्या जागेवरून हटविल्यास ते दुसरीकडे जागा खरेदी करून घरे बांधू शकणार नाही. त्यामुळे रेल्वे विभागाने त्यांची घरे पाडून त्यांना बेघर करू नये, व घरे हटवायचीच झाल्यास त्यांना इतरत्र जागा उपलब्ध करून द्यावी. रेल्वे विभागाने रेल्वेच्या हद्दीतील घरे हटविण्यासंदर्भात सूचना जारी केल्या पासून येथील रहिवासी ग्रामपंचायतेला साकडे घालत आहे. परंतु ग्रामपंचायतेकडे एवढ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याकरिता जागाच उपलब्ध नसल्याने रेल्वे विभागाने अथवा शासनाने या नागरिकांचे पुनर्वसन करण्याकरिता जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राजूर ग्रामपंचायतेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत खासदार बाळूभाऊ धानोरकर व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देतांना राजूर ग्रामपंचायतेच्या सरपंचा विद्याताई पेरकावार व ग्रामपंचायतेचे सर्व सदस्य उपस्थित होते.
रेल्वेच्या हद्दीतील घरे हटविल्यास त्यांच्या पुनर्वसनाकरिता जागा उपलब्ध करून द्यावी, राजूर ग्रामपंचायतेची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 15, 2022
Rating:
