सेवानिवृत्त प्राचार्याला ३६ लाख ८७ हजारांनी गंडविले, पॉलिसीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून घातला गंडा !

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : लाईफ इन्शुरन्स पॉलिसीची मुद्दत भरल्याचे सांगून पॉलिसीचे पैसे मिळण्याकरिता थोडे फार चार्जेस लागतील अशा भूलथापा देत एका सेवानिवृत्त प्राचार्याला तब्बल ३६ लाख ८७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून सहा जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने गंडविल्याची तक्रार सेवानिवृत्त प्राचार्यांनी पोलिस स्टेशनला केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा व माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विद्यालयाचा प्राचार्य राहिलेला ज्ञानसंपन्न व्यक्ती भूलथापा व आमिषाला बळी पडून भविष्य निर्वाह निधी गमावून बसला याचेच आश्चर्य वाटते. 

मारेगाव येथील एका विद्यालयातून सेवानिवृत्त झालेले व वणी वडगाव रोडवरील आनंद नगर येथे वास्तव्यास असलेले मारोती महादेव घागी (६७) यांना एचडीएफसी अँड मॅक्स लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून सहा जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने तब्बल ३६ लाख ८७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. पॉलिसी विड्रॉल करण्याकरिता थोडेफार चार्जेस लागतील अशा भूलथापा देऊन त्यांनी या सेवानिवृत्त प्राचार्यांच्या जमापुंजीलाच विड्रॉल करून घेतले. सहा जणांनी वारंवार फोन करून आधी पॉलिसीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून तर नंतर आयकर विभागाच्या कार्यवाहीची भीती दाखवून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. मारोती घागी यांनी जवळपास २५ वेळा त्यांना बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. प्राचार्य पदावर राहिलेला उच्च शिक्षित व्यक्ती आमिषाला बळी पडून जीवनभराची जमापुंजी गमावून बसतो, ही चिंतनीय बाब आहे. बँकेकडून नेहमी सतर्कतेच्या सूचना दिल्या जातात. मग बुद्धिजीवी लोकं कसे काय ठगबाजांच्या आहारी जातात, याचेच नवल वाटते. ४ लाखाच्या इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम मिळविण्याकरिता या सेवानिवृत्त प्राचार्याने तब्बल ३६ लाख ८७ हजार रुपये चार्जेस म्हणून भरले आहेत. सहा जणांनी वारंवार फोन करून २७ ऑक्टोबर २०२१ ते ५ जानेवारी २०२२ या काळात मारोती घागी यांच्या कडून २५ वेळा पैसे ट्रान्सफर करवून घेतले. ज्यावेळी त्यांना आमिषे व विविध करणे सांगून ठगविले जात होते, त्यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारची शाहनिशा केली नाही. आता ३६ लाख ८७ हजार रुपयांचा ठगबाजांनी गंडा घातल्यानंतर मारोती घागी यांनी २७ जानेवारीला पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि च्या कलम ४२० व ६६(ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

पुढील तपास वणी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस करित आहे.
सेवानिवृत्त प्राचार्याला ३६ लाख ८७ हजारांनी गंडविले, पॉलिसीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून घातला गंडा ! सेवानिवृत्त प्राचार्याला ३६ लाख ८७ हजारांनी गंडविले, पॉलिसीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून घातला गंडा ! Reviewed by सह्याद्री चौफेर on January 28, 2022 Rating: 5
Powered by Blogger.