सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : वणी तालुका जागृत पत्रकार संघाच्या वतीने स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकार दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी "दर्पण" नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सुरु केले. त्या दिवसाची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केल्या जातो. याच दिनाचे औचित्य साधून जागृत पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ विश्रामगृह येथे पत्रकार दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ईजहार शेख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष पारखी, जागृत पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष राजू धांवंजेवार उपस्थित होते. तसेच यावेळी जागृत पत्रकार संघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर अनाथांची माय झालेल्या सिंधुताई सपकाळ यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांना व काही दिवसांआधी आजाराने मृत्यू ओढवलेल्या पत्रकार मुन्ना बोथरा यांना यावेळी मौन श्रद्धांजली देण्यात आली.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ब्रिटिश राजवटीत दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरु केले. लोकांचे प्रबोधन व मनोरंजन व्हावे हा त्यांचा त्यावेळी वृत्तपत्र सुरु करण्यामागचा उद्देश होता. दर्पण वृत्तपत्राने मराठी वृत्ततालिकेत नवे पर्व सुरु केले. समता व व्यक्ती स्वातंत्र्य तत्वावर समाजाची पुनर्स्थापना करण्याचा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या वृत्तपत्राच्या माध्यमातून नेहमी प्रयत्न केला. २६ जानेवारी १८४० रोजी दर्पण या वृत्तपत्राचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. त्यानंतर मराठी वृत्तसृष्टीत अनेक मराठी वृत्तपत्र आली, व आजही मराठी वृत्तपत्रांनी आपलं एक वेगळच स्थान टिकवून ठेवलं आहे, असे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष ईजहार शेख यांनी यावेळी व्यक्त केले. तर जागृत पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष राजू धावंजेवार यांनी त्या काळातील पत्रकारिता व आजची पत्रकारिता यात मोठा फरक दिसून येत असल्याचे आपल्या भाषणात म्हटले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले संतोष पारखी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करतांना पत्रकार हा समाजाचा खरा आरसा असल्याचे म्हटले. त्याचप्रमाणे उपस्थितांनीही यावेळी आपापले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम नवघरे यांनी केले.
कार्यक्रमाला जागृत पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप बेसरकर, सचिव मो. मुस्ताक, सहसचिव पुरुषोत्तम नवघरे, कोषाध्यक्ष श्रीकांत किटकुले, सदस्य गणेश रांगणकर, प्रशांत चंदनखेडे, आकाश दुबे, मनोज नवले, राहुल अहुजा, प्रवीण नैताम, सुभाष पाचभाई, बाबाराव राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जागृत पत्रकार संघातील सर्वांनीच सहकार्य केले.
जागृत पत्रकार संघाच्या वतीने विश्रामगृह येथे घेण्यात आला पत्रकार दिनाचा कार्यक्रम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 06, 2022
Rating:
