सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी तालुका हा कोळसाखाणींनी वेढलेला आहे. कोळसाखाणींमधून सातत्याने कोळशाची वाहतूक सुरु असते. त्यामुळे याठिकाणी अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. कोळसाखाणींमुळे प्रदूषणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वणी तालुक्याने प्रदूषणाची उच्च पातळी गाठली आहे. राजूर कॉलरी येथेही कोळसा खाणी व चुन्याचे भट्टे आहेत. येथेही मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रदूषण पाहायला मिळते. कोळशाची धूळ हवेत पसरून प्रदूषित हवेत श्वास घ्यावा लागत असल्याने तालुक्यातील नागरिक फुफ्फुसाच्या व श्वसनाच्या अनेक आजारांनी ग्रस्त झाले आहेत. अशा या गंभीर आजाराच्या रुग्णांना सर्व सोईनीयुक्त रुग्णालयात उपचार मिळण्याची नितांत आवशक्ता असते. सर्वसामान्य रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य होत नसल्याने त्यांना उपचाराच्या सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या निम शासकीय रुग्णालयात उपचार मिळावा, याकरिता राजूर ग्रामपंचायतेने आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे), वर्धा येथील रुग्णालय व्यवस्थापनाला वारंवार निवेदने देऊन येथील रुग्णांकरिता मोफत बस सेवा सुरु करण्याची मागणी रेटून धरली. ग्रामपंचायतेच्या मागणीची दखल घेत आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व्यवस्थापनाने राजूर येथून रुग्णांना सावंगी येथे उपचारासाठी जाण्याकरिता मोफत साप्ताहिक बस सेवा सुरु केली. या बस सेवेचा लाभ वणी शहर व आसपासच्या गावातील रुग्णांनाही घेता येणार आहे. अती गंभीर आजार झालेल्या रुग्णांना सावंगी (मेघे) येथे उपचारासाठी जाण्यायेण्याकरिता रुग्णालयाची ही मोफत बस सेवा वणी तालुक्यातील रुग्णांकरिता अतिशय लाभदायक ठरणार असल्याचे राजूर ग्रामपंचायतेच्या सरपंचा विद्याताई पेरकावार यांनी बस सेवा प्रारंभ झाल्यानंतर नागरिकांशी संवाद साधतांना म्हटले.
सावंगी (मेघे), वर्धा येथे उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांकरिता राजूर येथून मोफत बस सेवा सुरु
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 07, 2022
Rating:
