शहरातील चार मटका अड्डे व दोन अवैध तंबाखू व्यवसायिकांवरील धाडीत तब्बल ४४ आरोपींवर गुन्हा दाखल, दोन आरोपी फरार
सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
अमरावती विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक चंद्रशेखर मिना यांच्या विशेष पोलिस पथकाने २९ जानेवारीला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वणी येथील चार अवैध मटका अड्ड्यांवर एकाच वेळी धाडी टाकल्या. अमरावती परिक्षेत्रातील परिविक्षाधिन पोलिस अधिक्षक गोवर हसन यांच्या नेतृत्वात चार पोलिस पथके तयार करून शहरातील चार मटका अड्यांवर एकाच वेळी या धाडी टाकण्यात आल्या. परिविक्षाधिन आयपीएस गोवर हसन यांच्या नेतृत्वातील विशेष पोलिस पथकात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा होता. अमरावती पोलिस उप महानिरीक्षक विभागाची वणीच्या इतिहासातील ही पहिलीच कार्यवाही असल्याचे बोलल्या जात आहे. या विशेष पोलिस पथकाने दीपक चौपाटी परिसरातील मटका अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत चार मोबाईल, ५ दुचाकी व ९५ हजार ४०० रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर १२ आरोपींना अटक केली. दोन आरोपी अद्याप फरार आहेत. सिंधी कॉलनी परिसरातील मटका अड्ड्यावर वरिल धाडीत पोलिसांनी तिन मोबाईल व २० हजार ५६० रुपये रोख असा एकूण २४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करित सात आरोपींना अटक केली. एकता नगर परिसरातील न.प. गाळ्यामध्ये सुरु असलेल्या मटका अड्यावर धाड टाकून पोलिसांनी ११ मोबाईल, १ दुचाकी व रोख १ लाख २७ हजार ११० रुपये असा एकूण १ लाख ९१ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, व १७ आरोपींना अटक केली. तर एकता नगर परिसरातील दुसऱ्या मटका अड्ड्यावर धाड मारून पोलिसांनी तीन मोबाईल व ५ हजार १०० रुपये रोख असा एकूण ९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एकंदरीत चार मटका अड्ड्यावरिल धाडीत विशेष पोलिस पथकाने ४ लाख ५७ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ४१ आरोपींना अटक केली. वणी शहरातील अवैध धंद्यांवरील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कार्यवाही असल्याचे बोलल्या जात आहे. अटक करण्यात आलेल्या ४१ व दोन फरार अशा एकूण ४३ आरोपींवर पोलिसांनी मजुका कायद्याच्या कलम १२(अ), १०९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
शहरात सुंगधित तंबाखू व सुगंधित गुटख्याची अवैधरित्या विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवरही या विशेष पोलिस पथकाने धाडी टाकून त्यांच पितळ उघडं पाडलं आहे. सिंधी कॉलनीतील साई ट्रेडर्स या दुकानावर धाड टाकून पोलिसांनी ४७ हजार १८८ रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व सुगंधित गुटखा जप्त केला. प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटखा दुकानात ठेऊन त्याची अवैध विक्री करणाऱ्या अनिल व्यवहारीमल नागदेव या व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर सिंधी कॉलनीतील राहत्या घरी धाड टाकून पोलिसांनी ४ लाख १६ हजार ५४२ रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व सुगंधित गुटखा जप्त केला आहे. प्रतिबंधित सुगंधित तंबाखाचा घरात अवैध साठा करून ठेवणाऱ्या सुरेश परेलाल गोधाणी व दीपक कवडू चावला दोन्ही रा. सिंधी कॉलनी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुगंधित तंबाखू व सुगंधित गुटख्याचा साठा करून त्याची अवैध विक्री करणे, याप्रकरणी पोलिसांनी तीनही आरोपींवर भादंवि च्या कलम १८८, २७२, २७३, ३२८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ पोलिस पथकाचे विजय वानखेडे, इकबाल शेख, प्रदीप ठाकरे, रवी इसनकर करित आहे.
शहरातील चार मटका अड्डे व दोन अवैध तंबाखू व्यवसायिकांवरील धाडीत तब्बल ४४ आरोपींवर गुन्हा दाखल, दोन आरोपी फरार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 31, 2022
Rating:
