राजूर येथील युवकाच्या खुनाचा पोलिसांनी अति शीघ्र लावला छडा, चार मारेकऱ्यांना केली अटक

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : सात दिवसांपूर्वी खुनाच्या झालेल्या घटनेने राजूर (कॉ.) हे गाव परत एकदा चर्चेत आले. प्रेम संबंधातून राजूर (कॉ.) येथील युवकाची त्याच्याच प्रियसीने हत्या घडवून आणल्याचे पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत उघड केले. एका चुन्याच्या भट्ट्यावर काम करणाऱ्या विवाहित महिलेबरोबर त्या युवकाचे सूत जुळले होते. बऱ्याच दिवसांपासून सुरु असलेल्या त्यांच्या प्रेम संबंधाची परिसरातही चर्चा होती. विवाहित महिलेशी अनैतिक संबंध ठेवणारा तो युवक नंतर तिच्याच नातलगांना खटकू लागला. कारण तिचा भटवाही (बहिणीचा नवरा) तिच्यावर भाळला होता. भटव्याचीही साळीवर वाईट नजर होती. अशातच त्या दोघांच्या मिलनस्थळी भाटवाही धडकल्याने प्रियकर व भाटव्यात चांगलीच जुंपली. प्रियकर व भाटव्यात उफाळलेला वाद पाहून प्रियसीने वडील व मामालाही घटनास्थळी बोलावून घेतले. मग काय सर्व नातलग झाले एक, व प्रियकराचाच केला गेम. महिलेशी अनैतिक संबंध असलेल्या युवकाला सर्वांनी मिळून यमसदनी धाडले. त्यात प्रियसीनेही हातभार लावला. प्रियकराच्या खुनात हात रंगविलेल्या प्रियसीसह पोलिसांनी तिचा भाटवा, तिचा बाप व तिचा मामा यांना अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

अतिशय गुंतागुंतीचे असलेल्या या खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी छडा लावला. एपीआय माया चाटसे यांनी कुशलतापूर्वक तपास करून खुनाच्या या रहस्यावरून पडदा उठवला. सुरुवातीपासूनच पोलिसांना युवकाची हत्या झाल्याचाच संशय होता. पोलिसांनी तेथे राहणाऱ्या काही मजुरांना तत्काळ चौकशी करीता ताब्यात घेतले. तेवढ्यात शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यात अतुल सहदेव खोब्रागडे (३९) याचा गळा लावल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. नंतर पोलिसांनी तपासाला गती देत संशयितांची कसून चौकशी केली. सुरुवातीला सोनू राजू सरावणे (२५) हिने आपला भाटवा हर्षद अंबादास जाधव (४५) याच्या मदतीने प्रियकर अतुल खोब्रागडे याचा खून केल्याचे सांगितले. नंतर त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा तीन दिवसांचा पीसीआर घेण्यात आला. पीसीआर दरम्यान सोनू सरावणे हिने सत्य हकीकत पोलिसांसमोर मांडली. अतुल खोब्रागडे व तिच्यात अनैतिक संबंध होते. ते भाटव्याला खटकत होते. ज्यादिवशी अतुल व सोनू ज्याठिकाणी भेटले, त्याच ठिकाणी सोनूचा भाटवाही आला. त्यांचे मिलन पाहून त्याचा चांगलाच पहारा चढला. त्याने अतुलशी वाद घालायला सुरुवात केली. वाद विकोपाला जाऊ लागल्याने तिने मदना जि. वर्धा येथून तिचे वडिल राजेश आनंदराव वाघमारे (४१) व मामा शंकर नत्थूजी वरघणे (३८) यांना बोलावून घेतले. त्यानंतर सर्व नातलग एक झाले, व त्यांनी अतुल खोब्रागडे याला गळा दाबून जिवानिशी ठार मारले. अतुल खोब्रागडे याची हत्या केल्यानंतर लगेचच वडिल व मामा चारचाकी वाहनाने मदना जि. वर्धा येथे निघून गेले. सोनू सरावणे हिने दिलेल्या बायनावरून पोलिसांनी २६ डिसेंबरला वडिल व मामला अटक केली. २० डिसेंबरला राजूर (कॉ.) परिसरातील चुना भट्ट्यामध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या निवासस्थानासमोर राजूर (कॉ.) येथील वार्ड क्रं. ३ मध्ये राहणाऱ्या अतुल खोब्रागडे याचा मृतदेह आढळून आला. यानंतर ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात एपीआय माया चाटसे यांनी योग्य दिशेने तपास करित युवकाच्या मृत्यूचे रहस्य उलगडले. पोलिसांनी प्रियसी सोनू राजू सरावणे (२५) रा. राजूर (कॉ.), हिच्यासह हर्षद अंबादास जाधव (४५) रा. वार्ड क्रं. ३ राजूर (कॉ.), राजेश आनंदराव वाघमारे (४१) रा. मदना जि. वर्धा, शंकर नत्थूजी वरघणे (३८) रा. मदना जि. वर्धा यांना अतुल खोब्रागडे याच्या खून प्रकरणात अटक केली असून त्यांच्यावर भादंवि च्या कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटिल भुजबळ, अप्पर पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, सपोनि माया चाटसे, परि. पोउपनि आशिष झिमटे, स.फौ. प्रभाकर कांबळे, नापोकॉ अविनाश बानकर, उमा कऱलूके, अमोल नुनेलवार, अमोल अन्नेरवार, शंकर चौधरी, राहुल बोन्डे, यांनी केली. पुढील तपास सपोनि माया चाटसे करित आहे.
राजूर येथील युवकाच्या खुनाचा पोलिसांनी अति शीघ्र लावला छडा, चार मारेकऱ्यांना केली अटक राजूर येथील युवकाच्या खुनाचा पोलिसांनी अति शीघ्र लावला छडा, चार मारेकऱ्यांना केली अटक Reviewed by सह्याद्री चौफेर on December 28, 2021 Rating: 5
Powered by Blogger.