सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाणदिना निमित्त शहर व तालुक्यात ठिकठिकाणी या महामानवाला अभिवादन करण्यात आले. तालुक्यातील लालगुडा ग्रामपंचायतेमध्येही त्यांच्या महापरिनिर्वाणदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. लालगूडयाचे सरपंच धनपाल चालखुरे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या कार्यक्रमाला उपसरपंच निलेश करवते, ग्रामसचिव पुरुषोत्तम फुलझेले व सदस्य वंदना चामाटे, रत्नमाला चालखुरे, वैशाली नगराळे, पूनम मंदे, शारदा मेश्राम, विद्या पचकटे प्रामुख्याने उपस्थित होते. धनपाल चालखुरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून हारार्पण केले. उपस्थित सर्वच ग्रामपंचायतेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी धनपाल चालखुरे यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकतांना प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची कास धरून उच्च विद्याविभूषित होण्याचा त्यांनी मान मिळविल्याचे सांगितले. तसेच विषमतेच्या त्या काळातही शिक्षणाची जिद्द बाळगून बहिष्कृत समाजाला समानता मिळवून देण्याचा केलेला संकल्पही त्यांनी पूर्ण केला. विषमतेचे वार झेलत मानवी समानतेसाठी त्यांनी केलेल्या संघर्षातूनच आज प्रजासत्ताक भारत बनला आहे. त्यांनी समाजात पसरलेली विषारी विषमताच जाळून टाकली. असा हा धगधगता ज्वालामुखी ६ डिसेंबर १९५६ ला शांत झाला खरा पण लोपला नाही. ज्ञानरूपाने आजही तो विचारवंतांमध्ये तेवत आहे. दीनदुबळ्यांच्या जीवनाचा शिल्पकार ठरतांनाच तो आधुनिक भारताचाही शिल्पकार ठरला. माणसाला माणसाच्या गुलामीतून मुक्त करणारा तो खरा मुक्तिदाता ठरला. यावेळी उपस्थितांनीही आपापले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ग्रामपंचायत कर्मचारी विशाल डुकरे, अंकुश गेडाम, वैशाली बर्डे यांनी सहकार्य केले. या अभिवादन कार्यक्रमाला ग्रामस्थांनीही उपस्थिती दर्शविली.वणी घुग्गुस मार्गावरील टोल नाका कार्यालयातही महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सरपंच धनपाल चालखुरे यांच्या पुढाकारातून हा अभिवादन सोहळा घेण्यात आला. यावेळी कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. या अभिवादन कार्यक्रमाला सरपंच धनपाल चालखुरे यांच्यासह टोल नाका सुपरवाईजर मनीष गोंडे, रोखपाल प्रवीण कोरेकर, विशाल वराडे व टोल नाक्याचे इतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनीच या महामानवाला अभिवादन करून त्यांच्या नावाचा जयघोष केला. यावेळी टोल नाका सुपरवाईजर मनीष गोंडे व उपस्थित मंडळींनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा गुणगौरव करित त्यांच्या संघर्षमय जीवनाची गाथा शब्दातून व्यक्त केली.