सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
राजूर कॉलरी येथील वार्ड क्रमांक ३ मध्ये राहणारा अतुल सहदेव खोब्रागडे (३९) हा चुना कारखान्यात काम करणाऱ्या मजुर वस्तीतील एका मजुराच्या घरासमोर मृतावस्थेत आढळून आला. पहाटे नागरिकांना मजूर वस्तीत मृतदेह दिसताच एकच खळबळ उडाली. मृतकही राजूर कॉलरी येथीलच असल्याने ही बातमी वाऱ्यासारखी गावात व नंतर वणी शहरापर्यंत पोहचली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. तेथील परिस्थिजन्य पुरावे हत्येच्या दिशेने इशारा करत असल्याने पोलिसांनी तेथील काही मजुरांची कसून चौकशी केली. तर काही संशयितांना चौकशीकरिता ताब्यात घेतले. अतुलच्या गळ्यावर असलेले व्रण व गावात सुरु असलेली कुजबुज यावरून पोलिसांनी संशयितांची चौकशी सुरूच ठेवली. दरम्यान शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यात गळा आवळल्याने युवकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी खुनाच्या दिशेने तपास करत संशयितांना पोलिसी खाक्या दाखवून कसून चौकशी केली. अखेर सोनू राजू सरवने (२५) या मजूर महिलेने अतुलचा खून केल्याची कबुली दिली. सोनू व अतुलचे प्रेमसंबंध होते. त्यांच्यात असलेले संबंध सोनूचा भाटवा हर्षद अंबादास जाधव (४०) याला कळाल्याने तो अतुलवर खार खाऊनच होता. अशातच अतुलचे सोनूशी असलेले संबंध तिच्या बहिणीच्या नवऱ्याला खटकू लागल्याने सोनुने अखेर आपल्या भाटव्याच्या मदतीने अतुलचा कायमचा बंदोबस्त करण्याचे ठरविले. १९ डिसेंबरच्या रात्री त्या दोघांनीही अतुलच्या खुनाचा कट रचला. त्याला फोन करून घरी बोलावण्यात आले, व घरातच त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. कुणाला संशय येऊ नये म्हणून मृतदेह घराबाहेर अंगणात ठेवण्यात आला. पण गुन्हा हा कधी न कधी उघड होतोच, याची त्या दोघांनाही विसर पडली होती. अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी युवकाच्या मृत्यूचे रहस्य उलगडून त्याच्या हत्येचा कट उघडकीस आणला. प्रेमसंबंधातून सोनुने अतुलची हत्या घडवून आणली. भाटव्याच्या मदतीने तिने अतुलचा कायमचा काटा काढला. दोघाही साळी भाटव्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक दिलिप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, एपीआय माया चाटसे, अविनाश बानकर, अमोल नुनेलवार यांनी केली.
राजूर कॉलरी येथे मृतावस्थेत आढळलेल्या युवकाचा झाला प्रेमसंबंधातून खून
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 24, 2021
Rating:
