एसडीपीओ पोलिस पथकाने पकडला रेतीची वाहतूक करणारा ट्रक


सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी  : रेती घाटांचे लिलाव न झाल्याने तालुक्यात चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक सुरु आहे. अवैधरित्या रेतीचा उपसा करून ती विक्री करण्याचा गोरखधंदा रेती तस्करांकडून मोठ्या प्रमाणात सुरु आहे. गौण खनिजाची चोरी होत असतांना प्रशासन मात्र त्याकडे डोळेझाक करतांना दिसत आहे. मोठे मासे जाळ्यात न अडकवता छोटे मासे पकडून पाठ थोपटाऊन घेतली जात आहे. गौण खनिजावर वाळू माफिया डल्ला मारत असल्याने शासनाचा लाखोंचा महसूल डुबत असतांना देखील कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. रेती तस्करीतून अमाप पैसा मिळत असल्याने अच्छे अच्छे या धंद्यात उतरले आहेत. प्रशासनावर शिरजोर होऊन वाळू माफिया रेती चोरीचा डाव साधत असून प्रशासन मात्र थातुरमातुर कारवाया करून वाहवाही लुटत आहे. रेती घाटांवरून चोरून आणलेल्या वाळूच्या विक्रीतून मोठा आर्थिक लाभ मिळत असल्याने तस्कर कोणतीही जोखीम पत्करायला तयार असतात, पण प्रशासन मात्र रेती तस्करीला लगाम लावण्याची जोखीम पत्करायला तयार नसल्याचे दिसत आहे. मोठी किंमत मोजून तस्करांकडून रेती खरेदी करावी लागत असल्याने सामान्यांचे हाल होत असतांना तस्कर मात्र चोरीची रेती विकून मालामाल होत आहे. रेती घाट खुले होण्यास विलंब होत असल्याने रेती तस्करांचे चांगलेच फावत आहे. महसूल विभाग व पोलिस प्रशासनाने रेतीची चोरी करणाऱ्या अनेक वाहनांवर कार्यवाही केली. पण रेती तस्करांवर त्याचा थोडाही परिणाम झाल्याचे दिसत नाही. दोन दिवसांपूर्वी एसडीपीओ पथकानेही रेतीची वाहतूक करणारा ट्रक पकडला. स्वतः एसडीपीओ संजय पुज्जलवार यांनी तो ट्रक पोलिस स्टेशनला लावून पुढील कार्यवाही महसूल विभागाकडे सोपविली. अद्याप रेती वाहतूक करणाऱ्या त्या ट्रक मधील रेतीची पडताळणी सुरूच आहे. ट्रक चालकाजवळ असलेली रॉयल्टी परतालुक्यातील असल्याने एसडीपीओ यांनी त्या रेती भरलेल्या ट्रकवर कार्यवाही केल्याचे समजते. 

एसडीपीओ कार्यालयाला रेती भरलेला ट्रक नांदेपेरा मार्गाने जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे एसडीपीओ यांनी पोलिस पथकासह त्या मार्गावर जाऊन पाहणी केली असता एक हायवा ट्रक त्यांना नाडेपेरा मार्गाने येतांना दिसला. त्या ट्रकला थांबवून ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये वाळू भरलेली दिसली. ट्रक चालकाला रॉयल्टी बाबत विचारले असता त्याने परतालुक्यातील रॉयल्टी पोलिसांना दाखवली. त्या रॉयल्टीवर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी MH ३४ BG ६४०० हा रेती भरलेला ट्रक ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला लावला. पुढील तपासणी व कार्यवाही करिता प्रकरण महसूल विभाकडे वळते केले. महसूल विभागाची अद्याप पडताळणी सुरु असून ट्रक पोलिस स्टेशनला उभा आहे. वणी तालुक्यापासून १०० किमी पेक्षाही लांब असलेल्या त्या तालुक्याच्या रॉयल्टीवर वणी तालुक्यात रेती आली, याचेच नवल वाटते.
एसडीपीओ पोलिस पथकाने पकडला रेतीची वाहतूक करणारा ट्रक एसडीपीओ पोलिस पथकाने पकडला रेतीची वाहतूक करणारा ट्रक Reviewed by सह्याद्री चौफेर on December 11, 2021 Rating: 5
Powered by Blogger.