लग्नाचे आमिष दाखवून केले शारीरिक शोषण, नंतर झाली गर्भधारणा; मुलगी सात वर्षाची झाली तरी आरोपी पोलिसांना मिळेना !

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : तालुक्यातील विरकुंड येथे राहणाऱ्या एका अनुसूचित जमातीतील महिलेचे शारीरिक शोषण करून तिला गर्भवती करणाऱ्या तेथीलच युवकाला अटक करण्यात अद्यापही पोलिसांना यश न आल्याने पीडित महिला ही मागील सात वर्षांपासून पोलिस स्टेशनचे उंबरठे झिजवित आहे. सदर युवकाने लग्नाचे आमिष दाखवून प्रस्थापित केलेल्या शारीरिक संबंधामुळे झालेल्या गर्भधारणेतून महिलेच्या पोटी जन्माला आलेली मुलगी आज सात वर्षाची झाली आहे. पण तिच्या कायदेशीर लढ्याला मात्र,अद्यापही यश आलेले नाही. पोलिसांनी आता तिच्या तक्रारीची दखलही घेणे बंद केल्याचे तिने आज २६ डिसेंबरला विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. शारीरिक शोषणकर्त्या युवकाच्या कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच पोलिसांच्या कार्यवाहीला ब्रेक लावला असल्याची पीडितेची खंत आहे. युवकाकडून शारीरिक शोषण झाल्यानंतर गर्भधारणा होऊनही पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याऐवजी पीडितेवरच दबाव आणल्याची कर्मकहाणी तिने पत्रकार परिषदेत कथन केली. शारीरिक उपभोग घेऊन युवकाने तर पळ काढला पण त्याच्या पासून झालेल्या मुलीच्या संगोपनाची जबाबदारी मात्र पीडिता एकाकी पार पाडत आहे. मुलीला वडिलांचे नावही न मिळाल्याने तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लग्न करण्याची ग्वाही देऊन शरीर संबंध ठेवले, व मातृत्व लादून तो फरार झाला. त्याच्या शारीरिक सुखाची ती बळी ठरली. तिच्यावर झालेल्या अन्यायाची ती स्वतःच शिक्षा भोगत असून त्यालाही त्याच्या चुकीची शिक्षा मिळावी या अपेक्षेने मागील सात वर्षांपासून न्यायासाठी ती पोलिस स्टेशनचे उंबरठे झिजवित आहे. पण तो सापडतच नसल्याचे कारण सांगून तिला आल्यापावली परत पाठविले जात आहे. कधी तरी पोलिस आरोपीचा शोध लावतील, व आपल्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळेल, हा विश्वास घेऊन ती सतत पोलिस स्टेशनला येत असते. 

तिने आपल्या दुर्दैवी जीवनाची कहाणी कथन करतांना सांगितले की, २००६ मध्ये तिचे लग्न झाले. मुलगा एसटीमध्ये नोकरीला आहे, असे सांगून या सामान्य कुटुंबाची फसवणूक करण्यात आली. नंतर दहा दिवसांतच तिचा घटस्पोट झाला. पच्छात ती रोजमजुरी करून आईवडिलांकडे राहू लागली. अशातच तिच्या भावाचा मित्र असलेला राकेश शंकर उईके रा. विरकुंड याचे त्यांच्या घरी जाणे येणे सुरु झाले. तो तिच्याशी निमित्त साधून बोलत असायचा. घराशेजारीच राहणारा व भावासोबतच इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करणारा राकेश उईके हा नंतर कोणत्या ना कोणत्या कारणाने वारंवार महिलेसोबत बोलू लागला. सतच्या होणाऱ्या संवादातून त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. नंतर एकमेकांत भावना गुंतत गेल्या. त्याने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे तिनेही आपले सर्वस्व त्याला अर्पण केले. २००९ पासून त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण केले. २०१३ मध्ये तिला त्याच्या पासून दिवस गेल्यानंतर तिने त्याच्याकडे लग्नासाठीचा आग्रह धरला. पण त्याच्या कुटुंबाला हे प्रकरण माहिती होताच त्यांनी साफ नकार दिला. व मुलाला मार्डी येथे लपवून ठेवले. पीडितेला आपली फसवणूक झाल्याचे कळातच तिने पोलिस स्टेशनला तक्रार देण्याची तयारी दर्शविली. पण तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांनी गावातच न्यायनिवाडा लावून देतो, असे सांगत सभा घेण्याच्या बहाण्याने त्यांना समिती कार्यालयातच डांबून ठेवले. पण समितीच्याच एका पदाधिकाऱ्याने त्यांची तेथून कशीबशी सुटका केली. नंतर पिडीतेने फेब्रुवारी २०१४ मध्ये सरळ वणी पोलिस स्टेशन गाठून राकेश उईके याच्या विरुद्ध रीतसर तक्रार नोंदविली. त्याच्यावर भादंवि च्या कलम ३७६, ४१७ नुसार गुन्हाही नोंदविण्यात आला. पण राकेश उईके याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली असल्याने व त्याचा काका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने त्याला अटक मात्र झाली नाही. त्याला त्याचा काका, कुटुंबातील अन्य सदस्य व त्याच्या एका मित्राने ऐन पाळण्याच्या दिवशी वणी तालुक्यातूनच फरार केले. त्यानंतर कार्यवाहीही थंडस्त्यातच चालली. त्यावेळी काकाने पोलिसांची बाजू धरून ठेवली. कार्यवाहीला वेग येण्याआधीच आर्थिक अडथळे निर्माण केले. त्यामुळे पोलिसांनीही महिलेलाच धाकदपट करणे सुरु केले. तिलाच आरोपी शोधण्याचं आव्हान दिल्या गेलं. सामान्य कुटुंबातील या महिलेला न्याय देण्याऐवजी अन्यायकारक वागणूक दिल्या गेली. तरीही पोलिसांवर व न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेऊन ती सात वर्षांपासून सतत पोलिस स्टेशनच्या चकरा मारत आहे. कधी तरी आरोपीला अटक होईल व आपल्याला न्याय मिळेल हा तिचा विश्वास आजही जिवंत आहे. आता तिला खरोखरच न्याय मिळेल की, अन्यायकारकच जीवन तिला जगावं लागेल, हे आता येणारा काळच सांगेल. पण न्यायासाठी धडपडत असलेल्या पीडित महिलेने पोलिसांकडून न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून केले शारीरिक शोषण, नंतर झाली गर्भधारणा; मुलगी सात वर्षाची झाली तरी आरोपी पोलिसांना मिळेना ! लग्नाचे आमिष दाखवून केले शारीरिक शोषण, नंतर झाली गर्भधारणा; मुलगी सात वर्षाची झाली तरी आरोपी पोलिसांना मिळेना ! Reviewed by सह्याद्री चौफेर on December 26, 2021 Rating: 5
Powered by Blogger.