सह्याद्री न्यूज : प्रशांत चंदनखेडे
ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी शासनाविरुद्ध बंड पुकारला. शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीला घेऊन कर्मचारी संपावर गेले. दिवाळी सारख्या सनालाच कर्मचाऱ्यांनी बसेस उभ्या केल्याने प्रवाशांचा चांगलाच हिरमोड झाला. दिवाळी साजरी करण्याकरिता नातेवाईकांकडे जाण्याचे आखलेले बेत कित्येकांना मोडावे लागले. अचानक कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या लढ्याचं शास्त्र हाती घेतल्याने प्रवाशांची चांगलीच कोंडी झाली. खाजगी वाहनांची कास धरल्यानंतरही सोयीचा प्रवास करता येत नसल्याने कित्येकांनी परगावी जाणेयेणेच टाळले. कोरोना काळानंतर नुकत्याच शाळा सुरु झाल्या होत्या. आता कुठे विद्यार्थी शाळेचा उंबरठा गाठू लागले होते. पण गाव खेड्यातील विद्यार्थ्यांचे शाळेत जाण्या येण्याचे साधनच बंद झाल्याने त्यांचा शाळेचा प्रवासचं थांबला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शाळेत जाणेच कठीण झाले. बसला पर्याय म्हणून काहींनी क्लुप्त्या लढविल्या असल्या तरी सर्वांनाच ते शक्य झाले नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. व आजही होतच आहे. शासनाने मध्यम मार्ग काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण विलीनीकरणाची एकमेव मागणी मान्य न झाल्याने कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यास नकार दिला. त्यानंतर शासनाने कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यास सुरुवात केली. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले नवीन कर्मचारी रुजू करून पोलिस बंदोबस्तात बस रवाना करण्यात आल्या. पण रस्त्यामध्येच त्या बस फुटल्या. डेपो मधून बस रवाना केल्यानंतर बसच्या काचा फुटू लागल्याने शासनाचा तो ही गेम प्लॅन फसला. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान, प्रवाशांचे होत असलेले हाल व कर्मचाऱ्यांचेही सुरु असलेले बेहाल केवळ संपाचा तोडगा न निघाल्याने सुरु आहेत. या लढ्यात काही कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. मागील दिड महिन्यांपासून आंदोलन सुरु असल्याने कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या कुटुंबांमधूनही उद्विग्नता व्यक्त होऊ लागली आहे. एका कर्मचाऱ्याच्या पत्नीने तर विषाची पुडी घेऊन आंदोलनस्थळ गाठले. काही दिवसांआधी येथीलच एका आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण या मागणीवर ताणलेले हे आंदोलन शासनाला विलीनीकरणाचा निर्णय घेण्यावर भाग पाडते की, मध्यम मार्गावर शांत होते, याकडे आता तालुक्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
"लढा विलीनीकरणाचा", या आंदोलनात कर्मचाऱ्यांची पत्नी आली विषाची पुडी घेऊन, सतर्कतेमुळे टळला अनर्थ
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 21, 2021
Rating:
