दुचाकीला अपघात होऊन विठ्ठलवाडी येथील वेकोली कर्मचाऱ्याचा मृत्यू

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : माहेरी गेलेल्या पत्नीला घरी आणावयास जात असलेल्या इसमाचा वाटेतच अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना आज १२ नोव्हेंबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. सदर इसम हा वेकोली कर्मचारी असून तो शहरातील विठ्ठलवाडी परिसरात वास्तव्यास होता. नायगाव बेलोरा वळण रस्त्यावर त्याच्या दुचाकीला अपघात झाला. दुचाकी अनियंत्रित होऊन त्याचा अपघात झाला की, अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली, हे अद्याप कळले नाही. रमेश यादव पझारे (५५) असे या अपघातात मरण पावलेल्या वेकोली कर्मचाऱ्याचे नाव आहे. 
पत्नी माहेरी गेल्याने रमेश पाझारे हा तिला आणण्याकरिता दुचाकीने जात होता. परंतु अचानक मार्गात मृत्यू आडवा आला. मार्गावर नियती दबा धरून बसली होती. पत्नीला घरी आणण्याच्या ओढीने जात असतांना नियतीने त्याच्यावर डाव साधला. पत्नीला गाठण्याआधीच मृत्यूने त्याला गाठले. नियतीला काही वेगळेच मंजूर होते. पहिला संसाराचा डाव मोडल्यानंतर दुसऱ्या संसाराची सुरुवात करणारा रमेशच आता जीवनाला मुकला आहे.  त्याच्या पश्चात दोन मुलं व पत्नी असा आप्त परिवार आहे. त्याच्या अशा या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
शिरपूर पोलिसांना अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून जागेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शविच्छेदनानंतर पार्थिव अतिम संस्काराकरिता कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. अपघाताचे नेमके कारण शोधण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केल्या जात आहे.

पुढील तपास शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिस करित आहे.
दुचाकीला अपघात होऊन विठ्ठलवाडी येथील वेकोली कर्मचाऱ्याचा मृत्यू दुचाकीला अपघात होऊन विठ्ठलवाडी येथील वेकोली कर्मचाऱ्याचा मृत्यू Reviewed by सह्याद्री चौफेर on November 13, 2021 Rating: 5
Powered by Blogger.