सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : वणी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पूर्णतः ढेपाळला असून अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णांची हेळसांड होतांना दिसत आहे. रुग्णांना आवश्यक त्या सोई सुविधा पुरविण्यात वणीचे ग्रामीण रुग्णालय असमर्थ ठरू लागले आहे. या ठिकाणी रुग्णांची मोठी गैरसोय होत असून रुग्णांना सेवा पुरविण्यात डॉक्टर व नर्सेस हयगय करीत असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. उपचाराची जराही हमी न घेता सरळ रुग्णांना इतरत्र हलविण्याचे फर्मान सोडले जात असल्याने येथील ग्रामीण रुग्णालय हे रेफर करणारे रुग्णालय म्हणून नावारूपास येऊ लागले आहे. आता तर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर सूडबुद्धीने रुग्णांना रेफर करू लागल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहे. बाळंतपणासाठी लागणारी कापडं धुतली नाही म्हणून एका बाळंतिणीला येथील डॉक्टरांनी चंद्रपूरला रेफर केल्याचा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. या खेद जनक प्रकरणाची त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार देखील केली आहे. वणी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत असून रुग्णसेवेचे व्रण घेतलेले वैद्यकीय अधिकारीच बेजवाबदारपणे वागत असल्याचे अनेक प्रकरणं समोर आले आहेत. ग्रामीण रुग्णालयात सुरु असलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यासंदर्भात राजू तुराणकर यांनी २७ सप्टेंबरला जिल्हा शल्य चिकित्सकांना लेखी पत्र पाठविले होते. त्यावर त्यांनी ग्रामीण रुग्णालयात सर्वांसमक्ष बैठक लावून रुग्णालय परिस्थीचा आढावा घेऊन परिस्थिती सुधारण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु आजही रुग्णालयातील परिस्थिती जैसे थे च आहे. सोई सुविधांच्या अभावाबरोबरच आरोग्य तपासणी यंत्रांचा अभाव व आवश्यक त्या औषधांचाही अभाव ग्रामीण रुग्णालयात नेहमी दिसून येतो. रॅबिजच्या इजेक्शनचाही नेहमी तुटवडाच राहतो. ऍसिडिटीचे इंजेक्शन उपलब्ध रहात नाही. ग्रामीण रुग्णालयाच्या बाबतीत रुग्णांचा नेहमी तक्रारींचा पाढाच असतो. ग्रामीण रुग्णालय सर्वच बाबतीत सुसज्ज व्हावे, याकरिता कुणीही पुढाकार घेतांना दिसत नाही. रुग्णालयाचा दर्जा सुधारण्याकरिता थातुरमातुर आंदोलने केली जातात, मग सगळं काही वेल सेट झालं की, मूक दर्शक बनून राहतात. रुग्णांचा कळवळाही जारकीय हेतू साध्य करण्यासाठीच दाखविला जातो. नंतर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची किती गैरसोय होते, याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नसतं. बाळंतिणीच्या बाबतीत घडलेला हा प्रकार अतिशय घृणास्पद असून या प्रकाराची चौकशी न झाल्यास शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
तालुक्यातील वारगाव येथील रंजना नितेश कोल्हे ही महिला प्रसूतीची वेळ आल्याने ग्रामीण रुग्णालयात भरती झाली. दोन दिवसांपासून भरती असलेल्या या महिलेला केवळ बाळंतपणासाठी लागणारी कापडं धुवून नसल्याने चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. ही बाब २३ नोव्हेंबरला राजू तुराणकर यांच्या लक्षात आली. त्यांनी या माणुसकीहीन प्रकरणाची जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार देखील केली. तसेच आरोग्य संचालक व उपायुक्त यांनाही फोन करून हा प्रकार सांगितला. या खेद जनक प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही न केल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी दिला आहे.