सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव : सरकारी कर्मचारी दिवाळीत बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी शहरात एकाच रात्री तब्बल पाच घरफोड्या केल्या. आमणी (खुर्द) रस्त्यावरील संभाजी ले आऊट मध्ये चार ठिकाणी घरफोड्या करून मुद्देमाल लंपास केला; तर बाजूलाच आमणी (बु.) रस्त्यावरील गिरीजानगर येथे एका ठिकाणी घरफोडी करण्यात आली.
रुपेश देशमुख यांच्या फ्लॅट मध्ये मारोतराव तमन्ना हे शिक्षक भाड्याने राहतात. बाजूलाच सतीश चौधरी यांचे घर असून, शिक्षक दत्तात्रय जंगमवाड तेथे भाड्याने राहतात. दिवाळीत हे कुटुंब मुळगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी डल्ला मारला. चांदीचे दिवे, चिल्लर नाणी व काही रक्कम चोरट्यांनी पळवली.
गिरीजानगरमधील अवधूत साबळे हे शिक्षक दिवाळी सणाला वडद या मुळगावी गेले होते. चोरट्यांनी त्यांचे घर फोडून दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने पळविले. दत्तराव काळसरे यांच्या घरी स्टेट बँके चे कर्मचारी आगम भाड्याने राहतात. त्यांचेही घर चोरट्यांनी फोडले. पाच ठिकाणी घरफोड्या करून चोरट्यांनी दोन लाखांच्या वर ऐवज लंपास केला. या संदर्भात अवधूत साबळे यांनी महागांव पोलिसांत तक्रार दाखल केली.
महागावात एकाच रात्री पाच घरे फोडली
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 10, 2021
Rating:
