खनिज संपत्तीचे वरदानच ठरत आहे घातक,कोळशाचे प्रदूषण आरोग्यासाठी घातक


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी जामणी : झरी जामणी तालुक्यातील टॉपवर्थ ऊर्जा अँड मेटल पॉवर लिमिटेड पांढरकवडा (लहान) येथील कोळसा खाणींमुळे प्रदूषणाची समस्या गंभीर झाली असून खनिज संपत्तीचे वरदानच लहान पांढरकवडा, अर्दवन, भेंडाळा, रूईकोट, मुकूटबन, गणेशपुर, नेरड व परीसरातील काही ग्रामवासियांसाठी घातक ठरत आहे. हवेतील कोळशाच्या थरात वाढ झाली असून ती आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे दमा, त्वचा संबं‌धीत रोग, कॅन्सर यासारख्या गंभीर आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

झरी जामणी तालुक्यात दोन खुल्या कोळसा खाणी आहेत. या खाणींमधून रोज शेकडो टन कोळसा उत्पादन घेतले जाते. भूमिगत कोळसा खाणी असुरक्षित म्हणून खुल्या कोळसा खाणी अस्तित्वात आल्या. परंतु टॉपवर्थ ऊर्जा अँड मेटल पॉवर लिमिटेड पांढरकवडा (लहान) येथील कोळसाखाण प्रदूषणाच्या दृष्टीने घातक ठरू लागली आहे. खुल्या कोळसा खाणींमधून जास्त कोळशाचे विक्रमी उत्पादन निघत असताना या परिसरात सुरुवाती पेक्षा प्रदूषणाच्या बाबतीत वाढीचा उच्चांक गाठत असल्याचे समोर येत आहे. लहान पांढरकवडा येथील कोळसा कंपनीत आठ वर्षांपासून कोळसा उत्खनन चालू असून कोळशाच्या धुळीमुळे वाढणारे प्रदूषण आणि कोळशाच्या जड वाहतुकीमुळे रस्त्यांची होणारी दुर्दशा गंभीर समस्या बनली आहे. प्रदूषण होऊ नये म्हणून रुईकोट ते मुकूटबन पर्यंत रस्त्यांवर पाणी न टाकणे, कोळसा उत्खनन करून काढण्याच्या प्रक्रियेने जमिनी खालील पाण्याची पातळी खाली जात आहे, सुरुंग स्फोटांमुळे घरांना तडे जाणे, धुळीने पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. कोळसा खाणीतील काळे पाणी अर्धवन च्या नाल्याला सोडल्याने ते दूषित पाणी जनावरांना प्यावे लागत आहे. कोळसा कंपनीने कुठेही दवाखाना तयार केला नसून इथे रुग्णवाहिका सुध्दा उपलब्ध नाही. आरोग्य शिबीर घेतले जात नाही. ग्रामीण मार्गावर वृक्षारोपण केले नाही. लोकांनी वारंवार लिखीत व तोंडी तक्रारी करूनही आरोग्य संबधी समस्या सोडविल्या जात नाही.

आरोग्याच्या गंभीर समस्या खाणप्रवण क्षेत्रातील नागरिकांना भेडसावत आहेत. या समस्या ‘जैसे थे’ च आहेत. या कोळसा खाणीवर वेळोवेळी टीकेची झोड उठली. पण त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्नच झाला नाही. केवळ विक्रमी उत्पादन काढण्याचा सपाटा जारीच आहे. पण त्यात आरोग्याकडे, सामाजिक समस्यांकडे व प्रदूषणाकडे मोठे दुर्लक्ष होत आहे. या खाणींमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून खाणीने प्रदूषण नियंत्रणा संदर्भात निकष पाळले नाहीत हे विशेष. वायू व जल प्रदूषणाने उच्चांक गाठल्याचे समोर येत आहे.

कोळसा कंपनी बाबत नागरिकांची सतत नाराजी:
कोल वॉशरी प्रकल्पाची पर्यावरण जनसुनावणी ११ फेब्रुवारी २०२० ला प्रादेशिक प्रदूषण निगम मंडळ अधीकारी चंद्रपूर मधुकर लाड यांच्या उपस्थीतीत घेण्यात आली होती. प्रास्तवित कोल वॉशरी प्रकल्पाला पांढरकवडा (लहान), मार्की, भेंडाळा, अर्धवन या ग्रामपंचायतीनी विरोध करीत हा प्रकल्प होऊ नये यासाठी चार ग्रामसभेचे ठराव सादर करण्यात आले होते. लहान पांढरकवडा येथील कोळसा कंपनीचे आठ वर्षांपासून उत्खनन सुरू आहे. परंतु या कंपनीचे अधिकाऱ्यांनी परिसरातील जनातेसोबत विकासात्मक समन्वय केव्हाच ठेवला नाही. कार्यरत अधिकारी अरेरावीची भाषा वापरतात यावरून या कोळसा कंपनी बाबत परिसरातील नागरिकांची सतत नाराजी उघडपणे स्पष्ट होते.


"कोळसा कंपनी विरुध्द आंदोलनाचा इशारा.
पांढरकवडा (लहान) पासून मुकुटबन, गणेशपुर, नेरड परिसरात कोळसा खाणीमुळे संपूर्ण परिसरात प्रदूषण केले आहे. मानवाचे हाडे दिवसेंदिवस ठीसुळ होत आहे. कोळशाच्या धुळीमुळे खाज, पोटाचे विकाराने जनता त्रस्त असून अनेक व्याधींनी ग्रस्त आहे. यात कोळसा वाहतूक करणारी कंपनी रस्तावर पाणी मारत नाही. प्रादेशिक प्रदूषण निगम मंडळ चंद्रपूर चे यावर कोणतेही नियंत्रण नसुन कसल्याच प्रकारची कारवाई करत नाही. या प्रदूषणाच्या विरोधात येत्या काही दिवसात या कंपनी विरुध्द भव्य अदोलन करू."
~मंगेश पाचभाई अडेगाव,
जनसेवक (सामाजिक युवा कार्यकर्ते)


"प्रदूषण निगम मंडळाचे नियंत्रण नसून कंपनीला वरदान
टॉपवर्थ ऊर्जा अँड मेटल पॉवर लिमिटेड पांढरकवडा (लहान) येथील कोळसा कंपनीसोबत चंद्रपूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मिलीभगत असल्यामुळे या कंपनीकडे दुर्लक्ष आहे. प्रदूषण निगम मंडळाचे नियंत्रण नसून या कंपनीला वरदानच दिले आहे त्यामुळे ही कंपनी कोणालाही जुमानत नाही. प्रदूषण नियंत्रणा संदर्भातील निकषानुसार येथील कोळसा कंपनी नियमाचे पालन करीत नसल्यामुळे चंद्रपूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर लक्ष केंद्रित करून कठोर कारवाई करण्यात यावी."
- नारायण गोडे
कोसारा, समाज सेवक वणी मतदार संघ.

खनिज संपत्तीचे वरदानच ठरत आहे घातक,कोळशाचे प्रदूषण आरोग्यासाठी घातक खनिज संपत्तीचे वरदानच ठरत आहे घातक,कोळशाचे प्रदूषण आरोग्यासाठी घातक Reviewed by सह्याद्री चौफेर on November 10, 2021 Rating: 5
Powered by Blogger.