सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे
वणी : "आपल्याला ज्या कोणत्या क्षेत्रात कार्य करायचे आहे त्या क्षेत्रातील आपले उदात्त ध्येय निश्चित करून, नित्य सरावाचा द्वारे, श्रीगुरुंनी केलेल्या मार्गदर्शनाचा विनम्रपणे स्वीकार करीत उन्नतीचा मार्ग धरला तर यश निश्चित आहे.
आपल्याला काय येते? या सोबतच आपल्याला काय येत नाही याची जाणीव अखंड जागृत ठेवून आपल्या मर्यादा ओळखून आपल्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करायला हवे.
आयुष्यात मिळालेले एखादे यश अंतिम नसून पुढील वाटचालीसाठी ते रसिकांचे प्रेम असते. आपल्याला ओळख निर्माण करून देणाऱ्या अशा प्रत्येक गोष्टीने वाढलेली जबाबदारी लक्षात ठेवत आयुष्यात कधीही पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ नये अशी वाटचाल आपण करीत रहावी." असे विचार सुर नवा ध्यास नवा या महागायिका संमिताताई शिंदे यांनी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे आयोजित सिनर्जी या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमात रियालिटी शो आणि करियर या विषयावर आभासी पद्धतीने त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होत्या. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी ग्रामीण भागातील आमच्या विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी सेतू स्वरूपातील सिनर्जी उपक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले.
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या ओंकार प्रधान रूप गणेशाचे या सुश्राव्य अभंगाने आरंभ करीत लहानपणापासून घरात झालेले संगीत संस्कार, शालेय वयातच भारतरत्न भीमसेन जोशी यांचे मिळालेले आशीर्वाद, मंगेश तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गजांनी केलेले कौतुक, सूर्यकांत गायकवाड यांच्या पासून सलील कुलकर्णी पर्यंत विविध गुरूंकडून मिळालेले मार्गदर्शन अशा स्वत:च्या जडणघडणीचा आलेख सांगितल्यानंतर आज दिसत असलेल्या यशाच्या पूर्वी अनेक वेळा अपयश पचवले आहे. त्यावेळी संगीतावरील निष्ठाच कामी आली असे सांगत आपल्या क्षेत्रात असलेल्या नवनवीन प्रयोगांबद्दल आपल्याला माहिती असायलाच हवी अशी भूमिका त्यांनी सादर केली.
मूर्तिकार आणि त्याच्या मुलाच्या प्रेरक कथेमधून माणसाच्या जीवनातील शिकण्याची ऊर्मी कधीच संपू नये हे अधोरेखित करीत या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांच्या बद्दल माहिती सांगत या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी नेमके मार्गदर्शन केले.
एक दिवसाचा रियाज सुटणे म्हणजेच आपल्या साधनेत आपण सात दिवस मागे पडणे. अशा मनोवेधक वचनांसह त्यांनी अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला.
विदर्भातील खेड्यापाड्यात असणाऱ्या कौशल्याला एकत्रित करीत आपण त्यांना असे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे तथा जोगवा सारख्या लोकगीतांचे संकलन अल्बम स्वरूपात सादर करावे अशी अपेक्षा अध्यक्षीय मनोगतात नरेंद्र नगरवाला यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास मंडळाचे संयोजक डॉ. अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. मानस कुमार गुप्ता यांनी केले.
कार्यक्रमाच्या तांत्रिक यशस्वीतेसाठी डॉ. गुलशन कुथे, डॉ. परेश पटेल, डॉ अजय राजूरकर तथा पंकज सोनटक्के यांनी विशेष परिश्रम घेतले.
ध्येय निश्चित करून विनम्रतेने उन्नती साधावी - संमिता शिंदे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 21, 2021
Rating:
