मुस्लिम आरक्षणासह विविध मागण्यांकरिता वंचितचे धरणे आंदोलन

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : मोहम्मद पैगंबर बिल मंजूर करण्याबरोबरच मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याच्या मागणीला घेऊन काल २२ नोव्हेंबरला वंचित बहुजन आघाडीच्या वणी शाखेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मुस्लिम आरक्षणासह विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. 

शासनाचे धोरण नेहमी मुस्लिम समाज विरोधी राहिले आहे. अल्पसंख्याकांचा शैक्षणिक व सामाजिक विकास साधण्याकडे शासनाने नेहमी दुर्लक्ष केले आहे. देशात व राज्यात मुस्लिम समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणाबद्दल केंद्र व राज्य शासनाकडे विविध समित्यांचे आणी आयोगांचे अहवाल पडलेले आहेत. मात्र शासन मुस्लिम समाजाच्या विकासाबाबत नेहमी उदासीनता दर्शविते. ५ टक्के मुस्लिम शैक्षणिक आरक्षणाला न्यायालयाची मान्यता मिळाल्यानंतरही शासनाने त्याची अंमलबजावणी केली नाही. यावरून शासनाची अल्पसंख्यांक विरोधी मानसिकता दिसून येते. त्यामुळे धार्मिक भावना भडकवून समाजात तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून "मोहम्मद पैगंबर बिल" गेल्या अधिवेशनात विधानपरिषद सदस्य आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून मांडण्यात आले होते. परंतु शासनाने या बिलाबाबत अद्याप कोणतीच कृती केलेली नाही. या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ५ जुलै २०२१ ला विधानभवनावर मोर्चा काढून ही मागणी निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविली होती. तरीही शासनातील तीनही पक्ष या मागणीकडे दुलक्ष करित असल्याने २२ नोव्हेंबरला या मागण्यांचे स्मरण करून देण्याकरिता वंचितच्या वतीने अल्पसंख्याकांच्या संवैधानिक अधिकारांसाठी हे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. 

उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून वंचितने केलेल्या विविध मागण्यांमध्ये धार्मिक भावना भडकवून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारे मोहम्मद पैगंबर बिल येत्या अधिवेशनात शासनाने मंजूर करावे, न्यायालयाने मान्यता दिलेले ५ टक्के मुस्लिम शैक्षणिक आरक्षण लागू करावे, महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या मिळकती मध्ये वाढ करून इमाम, मुअज्जीन व खुद्दाम हजरत यांना मासिक वेतन सुरु करावे, संत विचारांचा प्रचारप्रसार करणाऱ्या ह.भ.प. कीर्तनकार यांना शासनाकडून मासिक वेतन सुरु करावे, वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अवैध कब्जे हटवून त्या जागेचा अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा, मुस्लिम अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करून कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा तिढा सोडवावा, वणी वेकोली क्षेत्रातील खाजगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार द्यावा, वणी तालुक्यातील शिंदोला, पुनवट येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई द्यावी, वणी उपविभागातील पोलिसांना प्रलंबित नक्षलग्रस्त भत्ता तत्काळ अदा करावा आदी मागण्यांचा समावेश आहे. 

या धरणे आंदोलनात वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग, तालुकाध्यक्ष दिलीप भोयर, शहर अध्यक्ष किशोर मुन, नरेंद्र लोणारे, निशिकांत पाटील यांनी सहभाग दर्शविला. निवेदनावर मिलिंद पाटील, गौतम जीवने, रवी कांबळे, चंद्रकला उराडे, निखिल चाफले, उमेश परेकार, सुभाष लसंते, करण मेश्राम, नईम अजीज, सलिम खान, असीम हुसेन, सुभाष गेडाम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मुस्लिम आरक्षणासह विविध मागण्यांकरिता वंचितचे धरणे आंदोलन मुस्लिम आरक्षणासह विविध मागण्यांकरिता वंचितचे धरणे आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on November 23, 2021 Rating: 5
Powered by Blogger.