दामोदर नगर येथील निवासस्थानी सुरु असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर पोलिसांची धाड

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (३ ऑक्टो.) : तालुक्यात क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्यांची मोठी संख्या आहे. बुकींनी ठिकठिकाणी क्रिकेट सट्टा घेण्याकरिता आपले फंटर बसविले आहे. क्रिकेट सट्ट्यावर मोठी आर्थिक उलाढाल होत असते. येथील बुकींचे दूरपर्यंत कनेक्शन असल्याने तालुक्यात क्रिकेट सट्ट्याचा मोठा व्याप आहे. क्रिकेट सामन्यांवर मोठमोठ्या रक्कमांची बाजी लावून पैशाची उधळण करणारे बरेच शौकीन आहेत. गुप्तता बाळगत ऑनलाईन पद्धतीने हा क्रिकेट वरिल सट्टा खेळला जातो. क्रिकेट सामन्यांवर पैशाची बाजी लावतांना लगवाडीचा संपूर्ण व्यवहार हा मोबाईल वर चालतो. बुकींनी सध्या आपले फंटर कुणालाही शंका येणार नाही, अशा निवासस्थानी बसविले आहे. पण क्रिकेट सट्टा घेणाऱ्यांवर पोलिसांची बारीक नजर असून निवासस्थानी सुरु असलेल्या दोन क्रिकेट सट्टा अड्ड्यांवर पोलिसांनी धाडी टाकून त्यांच्या गोपनीयतेचे सर्व मनसुबे उधळून लावले आहे. काल २ ऑक्टोबरला अशाच एका निवासस्थानी सुरु असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून एका आरोपीसह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

वणी वरोरा रोडवरील दामोदर नगर येथील एका निवासस्थानी आयपीएल क्रिकेट सामन्यांवर मोबाईल द्वारे ऑनलाईन सट्टा घेतला जात असल्याची विश्वसनीय माहिती डीबी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे डीबी पथकाने दामोदर नगर येथील राहत्या घरी धाड टाकली असता घरातील एका खोलीत सतिश रघुराम मेहतो (४०) हा चेन्नई सुपर किंग व राजस्थान रॉयल यांच्या दरम्यान सुरु असलेल्या सामन्यावर मोबाईलद्वारे सट्टा घेत असल्याचे आढळून आले. क्रिकेट सामन्यावर सट्टा घेतांना आरोपीला पोलिसांनी रंगेहात अटक केली. क्रिकेट सट्टा खेळणे व खेळविणे कायद्याने गुन्हा असतांना देखील लपून छपून क्रिकेट सट्टा खेळला व खेळवला जात असल्याचे एका मागून एक प्रकरण समोर येत आहे. पोलिसांनी आरोपी जवळून क्रिकेट सट्टयासाठी वापरले जाणारे साहित्य, तिन मोबाईल हँडसेट किंमत ४४ हजार व रोख ६० हजार ८५० असा एकूण १ लाख ५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी सतिश मेहतो याच्यावर म.दा.का. च्या कलम ४, ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलिप पाटिल भुजबळ, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, डीबी पथकाचे उपपोनि आनंदराव पिंगळे, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, अशोक टेकाळे, रत्नपाल मोहाडे, हरिन्द्र कुमार भारती, पंकज उंबरकर, दीपक वान्ड्रूसवार, विशाल गेडाम, शंकर चौधरी, वसीम शेख यांनी केली.
दामोदर नगर येथील निवासस्थानी सुरु असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर पोलिसांची धाड दामोदर नगर येथील निवासस्थानी सुरु असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर पोलिसांची धाड Reviewed by सह्याद्री चौफेर on October 03, 2021 Rating: 5
Powered by Blogger.