पळसोनी ग्रामपंचायतेत सदस्यांविनाच साजरी झाली महापुरुषांची जयंती

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (३ ऑक्टो.) : पळसोनी ग्रामपंचायतेमध्ये सध्या मनमानी कारभार सुरु असल्याचे दिसून येत आहे. पळसोनी ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंच हे आपल्या मन मर्जीने कामे करित असल्याचे बोलल्या जात आहे. ग्रामपंचायतेचे काही निवडक सदस्य व मर्जीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीतच सभा संमेलने घेण्यात येत असल्याचा अन्य ग्रामपंचायत सदस्यांचा आरोप आहे. ग्रामपंचायतेंतर्गत कोणतेही कार्यक्रम घेतांना ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेतल्या जात नसल्याचे काही सदस्यांचे म्हणणे आहे. काल २ ऑक्टोबरला महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती दिनाचा ग्रामपंचायतेमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला सर्व ग्रामपंचायत सदस्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देणे बंधनकारक होते. पण सरपंच व उपसरपंच यांना महापुरुषांच्या जयंती दिनाच्या कार्यक्रमाला इतर ग्रा.प. सदस्यांना बोलावणं जरुरीच वाटलं नाही. या सदस्यांना कार्यक्रमाच्या सूचना देणं जाणीवपूर्वक टाळण्यात आलं. ग्रामपंचायते कडून अधिकृत सूचना न मिळाल्याने ग्रामपंचायतेमध्ये जयंतीचा कार्यक्रम घेतल्या जातो की नाही, हा संभ्रम निर्माण झाला होता. अशातच ग्रामपंचायत सदस्य पुखराज खैरे हे सहज ग्रामपंचायतेकडे फेरफटका मारण्याकरिता गेले असता त्यांना काही निवडक लोकांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतेमध्ये जयंतीचा कार्यक्रम सुरु असल्याचे आढळून आले. गावातील प्रतिष्ठित नागरिक व माजी सरपंच बेलेकर व मालेकर हे ग्रामपंचायतेबाहेर उभे होते. पण त्यांनाही कार्यक्रमात निमंत्रित करावेसे वाटले नाही. गावातील बऱ्याच ग्रामस्थांनाही ग्रामपंचायतेने कार्यक्रमाच्या सूचना दिल्या नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य व अन्य गाव वासियांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. पुखराज खैरे यांनी जयंती दिनाचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याच्या सर्वांनाच अधिकृत सूचना का दिल्या नाही, याबाबत सरपंचाकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत तेथून काढता पाय घेतला. सरपंच व उपसरपंच यांच्या मनमर्जी धोरणामुळे इतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांमध्ये चांगलाच असंतोष निर्माण झाला आहे.
पळसोनी ग्रामपंचायतेत सदस्यांविनाच साजरी झाली महापुरुषांची जयंती पळसोनी ग्रामपंचायतेत सदस्यांविनाच साजरी झाली महापुरुषांची जयंती Reviewed by सह्याद्री चौफेर on October 03, 2021 Rating: 5
Powered by Blogger.