चंद्रपूर जिल्ह्यासाठी गरजेनुसार महामंडळाच्या ५० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून द्या- आ. जोरगेवारांची मागणी

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२८ ऑक्टो.) : चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत महामंडळच्या बसेस कमी पडत असल्याने प्रवासी वाहतूक प्रभावित होत असून बसेसची कमतरता लक्षात घेता फेऱ्या कमी करण्यात आल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, अतिरिक्त भाडे देऊन खाजगी प्रवासी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याचे दिसुन येते. सदरहु बाब लक्षात घेता चंद्रपूर जिल्हाकरिता एसटी महामंडळने ५० अतिरिक्त बसेस उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना केली आहे. आमदार जोरगेवार यांनी आज गुरुवारी मुबंई मंत्रालय येथे परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली असून सदरहु मागणी संदर्भात सविस्तर चर्चा केली आहे.
   
चंद्रपूर जिल्हा औद्योगिक पाश्र्वभूमी आणि पर्यटन साठी प्रसिद्ध आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात विविध प्रकारचे उद्योगधंदे प्रस्तापित असून राज्यातील सर्वात मोठे विद्युत प्रकल्प येथे स्थित आहे. पोलाद, सिमेंट, कागद, रासायनिक, उद्योगांसोबत मँगनीज, लोह, कोळसा या सारख्या खनिज संपत्तीच्या खाणी मोठ्या प्रमाणात चंद्रपूरात अस्तित्वात आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग स्थायिक आहे. या कामगार वर्गाला आर्थिक दृष्ट्या खाजगी प्रवासी वाहतूक परवडण्या सारखी नाही. त्यामुळे बहुतांश कामगार वर्ग हा प्रवासी वाहतूकीकरिता महामंडळच्या बसेसला प्राधान्य देतो. त्याचप्रमाणे इतर सामान्य नागरिक व विद्यार्थी वर्ग सुद्धा ग्रामीण भागातून इतर भागात प्रवासाकरिता मोठ्या प्रमाणात एस.टी.नी प्रवास करतात. ग्रामीण भागाला जिल्ह्यातील महत्वपूर्ण शहरांना जोडण्यांचे काम महामंडळच्या बसेस द्वारे होत असते. त्यामुळे खाजगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत सवलतीच्या दरात महामंडळच्या एस.टी. बसेसला नागरिकांकडून प्राधान्य दिले जाते. परंतु जिल्ह्याच्या वाढत्या लोकसंख्याच्या तुलनेत उपलब्ध महामंडळच्या बसेस कमी आहे.
आजच्या स्थितीत चंद्रपूर जिल्ह्याला केवळ २४५ बसेस उपलब्ध आहे. त्यातील २० ते २५ बसेस अकार्यक्षम आहे. अशा स्थितीत जिल्ह्याला बसेसचा अत्याधिक तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बस फेऱ्या कमी करण्यात आलेल्या आहे. परिणामी कामगार वर्ग, सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना अतिरिक्त भाडे देऊन खाजगी प्रवासी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. जिल्ह्याला अतिरिक्त ५० बसेसची गरज असून ती पूर्ण करण्यात यावी अशी मागणी यावेळी आमदार जोरगेवार यांनी परिवहन मंत्री यांना केली आहे.
 
चंद्रपूर जिल्ह्यासाठी गरजेनुसार महामंडळाच्या ५० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून द्या- आ. जोरगेवारांची मागणी चंद्रपूर जिल्ह्यासाठी गरजेनुसार महामंडळाच्या ५० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून द्या- आ. जोरगेवारांची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on October 28, 2021 Rating: 5
Powered by Blogger.