सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२१ ऑक्टो.) : शहरातील एकता नगर येथील मटका अड्यावर पडलेल्या धाडीने अवैध व्यावसायिकांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहे.
सायबर सेल व एलसीबीने आज २० ऑक्टोबरला सायंकाळच्या सुमारास मटका अड्यावर संयुक्तिक धाड टाकून मटक्याची लगवाडी घेणाऱ्या जवळपास ३५ सट्टेबाजांना अटक केली आहे. मटक्याचे आकडे उतरविण्याकरिता उपयोगात येणाऱ्या साहित्यासह ३५ जणांना अटक करून पोलिस स्टेशनला आणल्यानंतर पोलिस स्टेशनच्या लॉकअप रूम जवळ मटक्याची शाळा भरल्यागत दिसत होते. एवढ्या मोठ्या संख्येने मटका घेणाऱ्यांना अटक करण्यात आल्याची शहरातील कदाचित ही पहिलीच कार्यवाही असावी. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदिप परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या गुप्तपणे सुरु असलेल्या मटक्यावर धाड टाकण्यात आली.
शहरात क्रिकेट सट्टा, ऑनलाईन सट्टा व मटका जुगार अड्यांवर पोलिसांचे धाडसत्र सुरु असतांना देखिल शहरात लपून छपून मटक्याचा हा खेळ सुरूच आहे. ऑनलाईन पद्धतीने मटका खेळविला जात असून मटक्याची उतारी घेण्याकरिता गुप्त ठिकाण शोधले जाते. सट्टा मटका चालविणारे कुणालाही संशय येऊ नये म्हणून लोकवस्तीत मकान भाड्याने घेऊन त्या ठिकाणी सट्टा मटक्याचा अड्डा चालवितात. आपल्या मर्जीतील व्यक्तींना सट्टा मटक्याच्या साहित्यासह त्या ठिकाणी बसवितात व त्यांच्या मार्फत सट्टा मटक्याच्या आकड्यासह लगवाडी उतरवितात. शहरातील एकता नगर परिसरातील नव्यानेच बांधकाम सुरु असलेल्या घरात मटका सुरु असल्याची विश्वसनीय माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदिप परदेशी यांना मिळाली. त्यांनी एलसीबीच्या पथकासह सायबर सेलच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्याठिकाणी सापळा रचला. सायंकाळच्या सुमारास नियोजनबद्ध पद्धतीने त्या घरावर धाड टाकण्यात आली. पोलिसांनी जराही सुगावा न लागू देता घरात प्रवेश केला. घरात त्यांना सट्टेबाजांची शाळाच भरलेली दिसली. मटक्याची उतारी उतरविण्याचे भरगच्च साहित्य आढळून आले. मटका घेणाऱ्यांचा मोठा समूहच पोलिसांच्या हाती लागला. मटक्याची उतारी घेणारया सर्वांनाच पोलिसांनी रंगेहात अटक केली. पळणे तर सोडाच जागचे हलण्याचीही पोलिसांनी त्यांना संधी दिली नाही. दोन घरांमधून जवळपास ३५ मटका घेणाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या जवळून ७० ते ७५ मोबाईल हँडसेट, लॅपटॉप व मटका उतरविण्याकरिता उपयोगात येणारे साहित्य असा लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एवढ्या मोठ्या संख्येने मटका घेणाऱ्यांना अटक करण्याची शहरातील आजवरची ही पहिलीच कार्यवाही असल्याचे बोलल्या जात आहे. या मटका अड्याचा बादशहा कोण आहे, हे अद्यापही कळू शकलेले नाही.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटिल भुजबळ, अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे, यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक प्रदिप परदेशी, सायबर सेलच्या अधिकारी दीपमाला भेंडे, सपोनि अमोल पुरी, पोउपनि भगवान पायघन, गजानन डोंगरे, विशाल भगत, उल्हास कुरकुटे, कवीश पाळेकर, सलमान शेख, किशोर झेंडेकर यांनी केली. पुढील तपास सुरु आहे.
एकता नगर परिसरातील मटका अड्यावर एलसीबी व सायबर सेलची संयुक्त धाड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 21, 2021
Rating:
