सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी, (१४ ऑक्टो.) : वणी येथील तहसील कार्यालय परिसरात असलेल्या सेतू केंद्राकडून विद्यार्थी व नागरिकांची लूट होत असल्याची तक्रार युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांनी जिल्हाधिकारी वणी दौऱ्यावर आले असताना निवेदनातून त्यांना करण्यात आली.
सदर सेतू सुविधा केंद्राचे कंत्राट संपलेले आहे तरी हे सेतू सुविधा केंद्र विनापरवानगी सुरु असून या केंद्रात जे शुल्क आकारले जाते त्यापेक्षा जास्त शुल्क घेत आहे. तसेच तात्काळ प्रमाणपत्र असल्यास 1500 ते 2000 हजार रुपयांची मागणी करतात असा आरोप त्यांनी निवेदनात नमूद केला आहे. संबंधित लिपिक उपविभागीय कार्यालय व संबंधित निवासी नायब तहसील कार्यालय हे सुद्धा प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. शिवाय सेतू केंद्रातील कर्मचारी यांचेमार्फत सुद्धा पैसे घेऊन प्रमाणपत्र तात्काळ देतात. ज्यांनी पैसे दिले नाही त्यांना 20 ते 25 दिवस प्रमाणपत्रासाठी वाट बघावी लागतेय. याच बाबत शिवसेनेच्या वतीने तक्रार करण्यात आली होती, तशा बातम्या प्रकाशित झाल्या. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने शिवसेना पाठोपाठ युवासेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे परत तक्रार करण्यात आली.
या सेतू सुविधा केंद्रातून विद्यार्थी व नागरिकांची अतोनात लूट चालू असल्यामुळे कंत्राट संपलेले सेतू केंद्र तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी उपस्थित युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, मिलिंद बावणे, हेमंत गौरकार, अमृत फुलझले, बबन खेडकर, सुमित चौधरी, ध्रुव येरणे, सौरभ वानखेडे, नितीन तुराणकर व सुयश नगराळे यांनी केली आहे.
वणी येथील सेतू केंद्राकडून लूट; युवासेनेची जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 14, 2021
Rating:
