सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (९ ऑक्टो.) : रंगनाथ नगर येथील एका दुकानदाराला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना काल ८ ऑक्टोबरला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. दारू पियुन उधार खर्रा मागून दुकानात धिंगाणा घालणाऱ्या युवकाला हटकले असता त्याने दुकानदारालाच शिवीगाळ करित त्याच्याशी वाद घातला. एवढेच नाही तर दुकानातील खर्रा घोटण्याचा लाकडी रंदा दुकानदाराच्या डोक्यावर मारला. त्यामुळे दुकानदाराच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. मध्यस्थी करण्यास आलेल्या आईलाही या मद्यपी युवकाने मारहाण केली. दुकानातील साहित्याचीही नासधूस केली. याबाबत दुकानदाराने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मद्यपी युवकावर गुन्हा दाखल केला आहे. शहरातील रंगनाथ नगर येथे वास्तव्यास असलेल्या भूपेंद्र सुधाकर पचारे (२७) याचे घराशेजारीच किराणा दुकान आहे. किराणा दुकानातून तो खर्रा विक्रीही करतो. त्याच्या दुकानात येऊन शंकर ज्योतीराम किनाके (३०) रा. भिमनगर हा नेहमी उधार खर्रा मागतो. उधार खर्रा देण्यावरून दुकानदाराशी नेहमी दारू पियुन वाद करतो. उधार खर्रा दिला नाही की, शिवीगाळ करून दुकानासमोर धिंगाणा घालतो. ८ ऑक्टोबरला रात्री शंकर कनाके हा मद्यपान करून भूपेंद्र पचारे याच्या दुकानात आला. उधार खर्रा का देत नाही म्हणून त्याला शिवीगाळ करू लागला. दुकानदाराने शिव्या का देतो, असे विचारले असता शंकर किनाके याने त्याच्याशी वाद घालत खर्रा घोटण्याचा रंदा त्याच्या डोक्यावर मारला. रंदा डोक्याच्या मागच्या बाजूला लागल्याने त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून आई मदतीला धावली असता मद्यपीने त्याच्या आईलाही मारहाण केली. एवढेच नाही तर दुकानातील वस्तूंचीही नासधूस केली. याबाबत भूपेंद्र पचारे याने पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी शंकर ज्योतीराम किनाके याच्या विरुद्ध भादंवि च्या कलम ३२४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस करित आहे.
उधार खर्रा का देत नाही म्हणून दुकानदाराचे फोडले डोके
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 09, 2021
Rating:
