सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२४ ऑक्टो.) : आयपीएल क्रिकेटचा हंगाम संपत नाही तोच मर्यादित षटकांच्या क्रिकेटची जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धा सुरु झाली आहे. टी-२० वर्ल्ड कपची धूम सुरु झाल्याने क्रिकेटवर सट्टा लावणारे व घेणारेही परत सज्ज झाले आहे. शहरात क्रिकेट सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळल्या जात असून बुकींनी सट्टा घेणारे आपले फंटर ठिकठिकाणी बसविले आहेत. येथील बुकींच दूरवर कनेक्शन असल्याने क्रिकेट सट्ट्यावर शहरात मोठी उलाढाल होतांना दिसते. क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्या शौकिनांची शहरात कमी नाही. सामान्यांपासून तर श्रीमंतांपर्यंत सर्वच क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळत असल्याने शहरात सट्ट्याचा हा खेळ चांगलाच फळाफुलाला आला आहे. आधी राजरोसपणे सुरु असलेला क्रिकेट सट्टा आता गोपनीय पद्धतीने खेळवला जात आहे. राहत्या घरांमधूनही क्रिकेटचा हा सट्टा ऑपरेट केल्या जात आहे. भरवस्तीत किरायाच्या किंवा स्वमालकीच्या घरात क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्यांना बसविले जात आहे. मोबाईलवर लगवाडी घेऊन क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळविल्या जात आहे. पोलिसांचे सट्टा मटक्यावर धाडसत्र सुरु असतांना देखील सट्टा मटका खेळणाऱ्या व खेळविणाऱ्यांवर त्याचा फारसा फरक पडलेला दिसत नाही. क्रिकेट सट्टा व सट्टा मटक्यावर कार्यवाहीचा बडगा सुरु असतांना देखील सट्टा मटक्याच्या या अवैध व्यवसायात उडी घेणाऱ्यांची संख्या कमी होतांना दिसत नाही. झटपट पैसे कमविण्याच्या लालसेपायी सट्टा खेळणारे व खेळविणारे कोणतीही जोखीम पत्करायला होतात. ऑनलाईन क्रिकेट सट्ट्याची शहरात सध्या चलती आहे. मोबाईलवर ऑनलाईन सट्टा घेणारे शहरात जिकडेतिकडेच ठाण मांडून बसले आहेत. अशाच एका घरात ऑनलाईन क्रिकेट सट्टा घेणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या सुरु असलेल्या टी- २० वर्ल्डकप मधिल ऑष्ट्रेलिया व साऊथ आफ्रिका यांच्या दरम्यान सुरु असलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या रंगनाथ नगर येथील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रंगनाथ नगर येथील एका घरात क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेतला जात असल्याची गुप्त माहिती ठाणेदार श्याम सोनटक्के यांना मिळाली. त्यांनी लगेच सपोनि माया चाटसे यांच्यासह डीबी पथकाला सोबत घेऊन त्या ठिकाणी धाड टाकली असता दोन आरोपी क्रिकेट सामन्यावर सट्टा घेतांना रंगेहात सापडले. क्रिकेट सामन्यावर मोबाईलद्वारे पैशाची लगवाडी घेतांना आढळून आल्याने पोलिसांनी आरोपी राजेश्वर सुरेश चापडे (३२) व साहिल अनिल झाडे (१९) दोघेही रा. रंगनाथ नगर यांना अटक केली. त्यांच्या जवळून सात मोबाईल फोन, लॅपटॉप, टी.व्ही. व क्रिकेट सट्टा घेण्याकरिता उपयोगात येणारे साहित्य असा एकूण ५६ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४,५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटिल भुजबळ, अप्पर पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, सपोनि माया चाटसे, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, अशोक टेकाळे, हरिन्द्रकुमार भारती, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, शंकर चौधरी यांनी केली.
क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांची धाड, दोन आरोपींना अटक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 24, 2021
Rating:
