सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२४ ऑक्टो.) : काळ्या कोळशाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वणी तालुक्यातील जनतेचं जीवनही काळवंडलं आहे. सतत उडणाऱ्या काळ्या धुळीमुळे येथील जनतेचा श्वास गुदमरायला लागला आहे. हवेतील धुळीच्या प्रदूषणामुळे जनतेचं आरोग्य पुरतं धोक्यात आलं आहे. काळ्या धुळीच्या विळख्यात जनतेचं जिवन जगणं सुरु आहे. शहर व तालुक्यातील प्रमुख मार्गांवर नेहमी काळ धुकं पसरलेलं असतं. या रस्त्यांनी जातांना मोकळा श्वास घेणं तर कठीण झालच आहे, पण या रस्त्यांवरून मार्गक्रमण करतांना शरीर व कपड्यावर काळा थर बसतो. या रस्त्यांनी दुचाकीने प्रवास करणे म्हणजे काळ्या गंगेत न्हाऊन निघण्यासारखे आहे. धूळ प्रदूषणामुळे येथील नागरिकांचं जीवनमान घटू लागलं आहे. संबंधित यंत्रणा कठोर पाऊले उचलत नसल्याने धुळीची समस्या अजूनही कायम आहे. ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वणी तालुक्यातील जनतेचा वर्णही काही काळानंतर काळाच झालेला पाहायला मिळणार आहे. नेहमी काळ्या धुळीत वावर रहात असल्याने बहुतांश नागरिकांची त्वचा काळी पडली आहे. या काळ्या धुळीमुळे फुफ्फुसाचे आजार बळावू लागले आहे. स्वच्छ हवेच्या अभावामुळे निरनिराळ्या आजारांनी नागरिक ग्रस्त झाले आहेत. या काळ्या नगरीत काळ्या पैशाची मोठी उलाढाल होत असल्याने सर्वांचेच तोंड काळ्या पैशाने बंद केले जाते. त्यामुळे संबंधित अधिकारी या तालुक्याकडे पाठ फिरवितांना दिसतात. प्रदूषण नियंत्रण विभाग थातुरमातुर चौकशी करून चालता बनतो. या काळ्या धुळीमुळे तालुक्यातील पर्यावरण पूर्णतः धोक्यात आलं आहे. प्रदूषित हवेत श्वास घ्यावा लागत असल्याने त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. वणी तालुका खदानींनी वेढलेला आहे. खदानीतून निघणारा कोळसा रस्ते मार्गाने रेल्वे सायडिंग व विद्युत प्रकल्पांमध्ये पाठविला जातो. खदानींमधून कोळशाची सतत वाहतूक सुरु असते. वणी वरोरा मार्गावर दोन कोळसा सायडिंग आहेत. येथे शेकडो ट्रक कोळशाची वाहतूक करतात. ट्रकांमध्ये वरपर्यंत कोळसा भरल्या जात असल्याने तो रस्त्याने सांडत येतो. नंतर त्या कोळशावरून वाहने जाऊन त्याची भुकटी तयार होते, व ती धुळीत रूपांतर होऊन वाहनांच्या जाण्या येण्याने उडू लागते. वणी वरोरा रोडवर काही अंतरापर्यंत तर धुळीचं साम्राज्य पसरलेलं असते. कोळशावर ताळपत्रीही व्यवस्थित झाकली जात नसल्याने ट्रकांमधून मोठ्या प्रमाणात कोळसा रस्त्यावर पडतो. कोळशाचे मोठमोठे ढेले रस्त्यावर पडत असल्याने कित्येक दुचाकीस्वारांना यामुळे अपघातही झाले आहेत. वणी वरोरा, वणी उकणी, वणी यवतमाळ, वणी घोन्सा, वणी घुग्गुस, वणी ते पैनगंगा व मुंगोली या मार्गावर नेहमी काळी धूळ उडत असते. या मार्गांवर नेमही काळं धुकं पसरलेलं असते. आंध्र व तेलंगणातही कोळशाच्या मोठमोठ्या खाणी आहेत. पण त्या ठिकाणी रस्त्यावर तर सोडाच खाणीमध्येही काळा धूळ उडतांना दिसत नाही. एवढी काळजी घेतली जाते. येथे तर खाणीमध्ये जाणारा माणूस काळाकुट्टच होऊन बाहेर पडतो. प्रदूषण नियंत्रण विभाग तर नावापुरताच उरला आहे. संबंधित अधिकारी तर याठिकाणी येऊन नुसते खिशे गरम करून जातात. नागरिकांच्या आरोग्याचं कुणालाच काही घेणंदेणं उरलेलं नाही. या काळ्या कोळशाच्या प्रदूषणानं नागरिकांचं जीवनमान घटू लागलं आहे. कोळसा खाणींमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना येथील नागरिकांनी तोंड द्यावं व सुख सुविधा इतरांनी उपभोगाव्या हे पूर्वापार चालत आलं आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे येथील नागरिकांचं जीवन नरकासमान झालं आहे. या काळ्या धुळी पासून नागरिकांची कधी मुक्तता होईल, व कधी स्वच्छ हवेत श्वास घ्यायला मिळेल याची आता शास्वतीच राहिलेली नाही.
कोळशाच्या काळ्या धुळीमुळे येथील नागरिकांचं जीवनच काळवंडलं
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 24, 2021
Rating:
