महाराष्ट्र बँकेच्या वणी शाखेचा कारभार ढेपाळला, रिक्त पदे भरण्यात होत आहे दिरंगाई !

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (१४ ऑक्टो.) : महाराष्ट्र बँकेच्या स्थानिक शाखेचा कारभार पूर्णतः ढेपाळला असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. सानेगुरुजी चौकात असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या प्रमुख शाखेचे कामकाज नियोजना अभावी प्रभावित झाले आहे. ग्राहकांना सेवा पुरविण्यात ही बँक कमी पडू लागली आहे. बँकेचे व्यवहार करतांना नागरिकांना चांगल्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील काही दिवसांत तर या बँकेचे व्यवहार करतांना ग्राहकांनी चांगलाच त्रास अनुभवला आहे. खातेदारांना खात्यात रक्कम जमा करतांना व काढतांना तासंतास रांगेत ताटकळत उभे रहावे लागत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तुटवळ्यामुळे बँकेच्या कामकाजात अतिशय ढिसाळपणा आला आहे. एकच कॅश काऊंटर सुरु रहात असल्याने खातेदारांची लांबचलांब रांग लागून रहात असल्याचे रोजचेच चित्र झाले आहे. रक्कम जमा करणे व काढणाऱ्यांसाठी एकच कॅश काऊंटर ठेवण्यात आले आहे. महिला व पुरुषांना एकाच रांगेत उभे करण्यात येत आहे. पुरुषांच्या मागे उभे राहण्यात संकोच होत असतांना देखील महिलांना एकाच रांगेत उभे राहण्याची सक्ती करण्यात येत आहे. निराधार वृद्ध महिला व पेन्शन धारकांनाही तासंतास रांगेत उभे रहावे लागत आहे. मागील काही दिवसांपासून एकाच रोखपालावर बँकेची देवाण घेवाण सुरु आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे बँकेचे व्यवहार करतांना ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रिक्त पदे वेळोवेळी भरली जात नसल्याने त्याचा बँकेच्या कामकाजावर मोठा परिणाम होत असल्याची खंत महाराष्ट्र बँकेचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक अनिल राऊत यांनी बोलून दाखविली आहे. तसेच त्यांनी डिजिटल व नेट बँकिंग सेवेचा जास्त लाभ घेण्याच्याही ग्राहकांना सूचना केल्या आहेत. त्यांनी एटीएमचा जास्त उपयोग करण्याचेही सुचविले आहे. पण एटीएमची सेवाही अधामधात विस्कळीतच राहते. बँकेची सेवा तर डळमळली आहेच, पण बँकेत सोई सुविधांचाही मोठा अभाव आहे. बँकेत बसण्याची व्यवस्था नाही, की ग्राहकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. जागेचाही मोठा अभाव आहे. महाराष्ट्राची शान असलेल्या या महाराष्ट्र बँकेची मोठी दुरावस्था झाली असून रिक्त पदांमुळे येथिक कामकाजावर मोठा परिणाम होतांना दिसत आहे. 
महाराष्ट्र बँकेच्या वणी शाखेचे शाखा व्यवस्थापक यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यापासून येथे शाखा व्यवस्थापकांची नियुक्तीच झाली नाही. माहिती प्रमुखही दोन महिन्यांपासून सुट्टीवरच आहे. दोन मुख्य व दोन कर्मचारी दर्जाच्या व्यक्तींची या बँकेत नियुक्ती होणे अत्यंत गरजेचे असतांना याकडे साफ दुर्लक्ष केल्या जात आहे. अतिरिक्त भार डोईवर घेऊन येथिल अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या प्रकृत्या ढासाळू लागल्या आहेत. एका महिला कर्मचाऱ्याची अतिरिक्त भार पेलून प्रकृती खराब झाल्याने त्या सुद्धा मागील काही दिवसांपासून सुट्टीवरच आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे बँकेच्या कामकाजाची गती मंदावल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. खात्यातील व्यवहाराकरिता तासंतास या बँकेत रांग लावून उभे राहावे लागत आहे. शासकीय सेवेतील रिक्त पदे भरण्यास दिरंगाई होत असल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय होत असून उत्तम सेवा मिळण्यापासून नागरिक वंचित रहात आहे. या बँकेचे कामकाज केंव्हा सुधारेल हा आता ज्याचा त्याचाच प्रश्न झाला आहे. उत्तम सेवा पुरविण्याकरिता बॅंकेतिल रिक्त पदे भरणे आधी आवश्यक आहे. या बँकेची पुढील वाटचाल कशी राहील याकडे आता ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र बँकेच्या वणी शाखेचा कारभार ढेपाळला, रिक्त पदे भरण्यात होत आहे दिरंगाई ! महाराष्ट्र बँकेच्या वणी शाखेचा कारभार ढेपाळला, रिक्त पदे भरण्यात होत आहे दिरंगाई ! Reviewed by सह्याद्री चौफेर on October 14, 2021 Rating: 5
Powered by Blogger.