सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२० ऑक्टो.) : कोळश्याची कमतरता लक्षात घेता उद्योगांचा आरक्षित असलेला कोळसाही विद्युत प्रकल्पांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, असे झाल्यास लघू व मध्यम उद्योग आणि पर्यायाने येथे काम करणारा कामगार वर्गही प्रभावित होणार आहे. ही बाब लक्षात घेता विदर्भातील उद्योगांना कोळसा पूरवठा करण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी वेकोलिचे सिएमडी मनोज कुमार यांना केली आहे.
मंगळवारी आमदार जोरगेवार यांनी विदर्भातील छोट्या उद्योजकांच्या शिष्टमंडळासह नागपूर येथे वेकोलिचे सीएमडी मनोज कुमार यांची भेट घेत सदरहु मागणी केली आहे. यावेळी फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन विदर्भचे अध्यक्ष मधूसुदन रुगंठा, मल्टी ऑर्गेनिक चे गोविंद जिचकार, लॉयड्स मेटलचे रंजन, बिल्ट्स चे भारत आवलावे, नागपूरच्या यंग इंडस्ट्रीड असोसीएशनचे चोखानी, नागपूर वेद असोसिएशनचे अध्यक्ष प्रदिप माहेश्वरी आदिंची उपस्थिती होती.
पावसामूळे कोळश्याचे उत्पादन घटले आहे. याचा परिणाम औष्णिक विज निर्मिती प्रकल्पांवर झाला आहे. ही बाब लक्षात घेता लघू आणि मध्यम उद्योगांसाठी आरक्षित असलेला कोळसाही आता सदर विद्युत प्रकल्पांना देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार कोळसा कंपन्यांनी कोळशाचे ई-लिलाव रद्द केले आहे. त्यामूळे कच्चा माल म्हणून कोळशावर अवलंबून असलेल्या विदर्भातील छोट्या आणि मध्यम उद्योगांची परिस्थिती गंभीर झाली आहे. येथील अनेक उद्योग निर्यातीभिमुख आहेत आणि अनेक उद्योग मुख्य उद्योगांना उत्पादने पुरवतात त्यामूळे या परिणाम मोठ्या उद्योगांवरही जाणवनार आहे.
गेल्या 20 महिन्यांपासून, कोविड -19 च्या संकटांमुळे उद्योगांवर अधिक वाईट परिणाम झाले आहे. त्यातच आता या उद्योगांना कोळसा पुरवठा बंद करण्याचा घेण्यात आलेल्या निर्णयामूळे सदर उद्योग ढबघाईस जातील. याचा मोठा परिणाम या उद्योगांमध्ये काम करणां-या कामगार व मजूर वर्गावरही दिसून येईल अनेकांचा रोजगार हिरावल्या जाईल त्यामूळे ही स्थिती टाळण्यासाठी कोळसा उत्पादन वाढविण्याच्या दिशेने युध्द पातळीवर प्रयत्न करुन लघू व मध्यम उद्योगांचा कोळसा पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी या बैठकीत आमदार जोरगेवार यांनी वेकोलि सिएमडी मनोज कुमार यांना केली आहे.
यावेळी सिएमडी मनोज कुमार यांच्यासोबत उद्योजकांच्या समक्ष आमदार यांची जवळपास दिडतास चर्चा झाली असून या संकटावर लवकरच मात करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सिएमडी मनोज कुमार यांनी म्हटले आहे.
विदर्भातील उद्योगांना कोळसा पूरवठा करा - आ. किशोर जोरगेवार यांची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 20, 2021
Rating:
