सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (१२ सप्टें.) : वणी तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून बंद घरे व बंद कंपण्यांना टार्गेट करून तेथील मौल्यवान वस्तू व साहित्य लंपास करण्याचा त्यांनी सपाटाच लावल्याचे मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. अशाच एका बंद कंपणीत चोरीचा डाव आखलेल्या चोरट्यांचा शिरपूर पोलिसांनी डाव उधळून लावला आहे. शिंदोला कळमना मार्गावरील बंद पडून असलेल्या शालिवाना प्रा. ली. या कंपनीतील मौल्यवान वस्तू व साहित्याची चोरी करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या आरोपींच्या शिरपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दिड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन असल्याने परिसरात गस्त घालीत असलेल्या पोलिस पथकाला शालिवाना कंपनीत चोरटे चोरी करणार असल्याची गुप्तहेरांकडून माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे शिरपूरचे ठाणेदार सचिन लुले यांनी आपल्या पोलिस पथकासह साध्या वेशात शालिवाना कंपनीत सापळा रचून कंपणीत चोरी करण्याच्या इराद्याने चारचाकी वाहनाने आलेल्या तिन आरोपींना अटक केली. तर अन्य तिन आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले. ही घटना ११ सप्टेंबरला रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. शिंदोला कळमना रोडवरील शालिवाना प्रा.ली. ही कंपनी बंद अवस्थेत आहे. या कंपणीत लोहा, तांब्याची तार व अन्य किमती वस्तू आहेत. या बंद कंपनीतील किमती वस्तू व साहित्यांवर हात साफ करण्याचे चोरट्यांचे मनसुबे शिरपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळल्या गेले. खबऱ्यांकडून या कंपणीत चोरी होणार असल्याची माहिती मिळताच ठाणेदार सचिन लुले यांनी अतिशय शिताफीने साध्या वेशात या कंपनीजवळ सापळा रचून तारांचे कुंपण तोडून कंपनीच्या आत प्रवेश केलेल्या तिन चोरट्यांना ताब्यात घेतले. हे चोरटे पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन घेऊन चोरी करण्याकरिता आले होते. पोलिसांनी धाड टाकल्याची चुणूक लागताच कंपणी बाहेर वाहनात बसून असलेल्या तिन आरोपींनी वाहनासह पळ काढला. अंधाराचा फायदा घेत ते सुसाट पळाले. पोलिसांनी अटक केलेल्या तीन आरोपींमध्ये मोहसीन निसार शेख (२३), शाहरुख शाहदतुल्ला कुरेशी (२४), ताहिद अहेमद कुरेशी (२२) सर्व रा. घुग्गुस यांचा समावेश आहे. त्यांच्या कडून चोरी करिता वापरण्यात येणारे कोयता, कुऱ्हाड, दोरी, दोन लोखंडी आरी पत्ते, व मोबाईल असे एकूण २७ हजार १०० रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. पोलिसांनी त्यांना पळून गेलेल्या अन्य साथीदारांची नावे विचारली असता त्यांनी अजय नायक, जॉनी व कौशल अशी सांगितली. त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदिप पाटिल यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सचिन लुले, पोउपनि राम कांडुरे, पोना प्रमोद जुनुरकर, गुणवंत पाटिल, गंगाधर घोडाम, अनिल सुरपाम, आशिष टेकाडे, अभिजित कोशटवार यांनी केली.
शिरपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे शालिवाना प्रा.ली. कंपनीत चोरी करण्याचा चोरट्यांचा डाव फसला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 12, 2021
Rating:
