शेतकऱ्यांचा जिवाभावाचा सोबती असणाऱ्या सर्जा राजाचा आज पोळा हा सण

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (०६ सप्टें.) : शेतकऱ्यांचा सर्वात मोठा व महत्वाचा सण म्हणून पोळा या सणाचं लौकिक आहे. वर्षभर आपल्या धन्यासोबत शेतात राबणाऱ्या सर्जा राज्याची पोळा या सणाला सजवणूक करून पूजा करण्यात येते. त्यांना या दिवशी गोडधोड भरविण्यात येते. ग्रामीण भागात पोळा या सणाला विशेष महत्व दिलं जातं. आनंदोत्सहात हा सण साजरा केल्या जातो. यावर्षीही कोरोनाच्या सावटातच पोळा हा सण साजरा करावा लागत आहे. शहरातील शासकीय मैदानावर (पाण्याची टांकी) बैलांचा पोळा भरविण्याची फार वर्षांपासूनची जुनी परंपरा आहे. पण कोरोनामुळे मागील वर्षीपासून या परंपरेला फाटा देण्यात आला आहे. शेतकरी आपल्या बैलांना मनोभावे सजवून शासकीय मैदानात आणायचे. ढोल ताशांच्या गजरात शासकीय मैदानावर बैलजोड्या आणल्या जायच्या. शेकडो लोकांच्या साक्षीने उत्कृष्ट सजावट असलेल्या बैलजोड्यांना पुरस्कार दिले जायचे. त्यानंतर पोळा फुटला म्हणून जाहीर केल्या जायचं. पोळा फुटताच सुसाट वेगानं धन्यासोबत बैलं पळत सुटायचे. नंतर रंगीबेरंगी फुग्यांनी व निरनिराळ्या खेळण्यांनी सजलेली दुकाने बालगोपाळांचं आकर्षण असायची. आपल्या मुलाबाळांसोबत वेळातवेळ काढून बैलपोळा बघण्याकरिता नागरिक आवर्जून यायचे. लहान्यापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांचीच हौस मौज पूर्ण करणारा शासकीय मैदानावरील हा पोळा कोरोनाच्या सावटात अडकला आहे. सार्वजनिकरित्या सण उत्सव साजरे केल्याने कोरोना वाढीस लागेल, या भीतीपोटी सण उत्सव घरगुतीच होऊन बसले आहेत. "कोरोनाची भीती, आणखी राहील किती, दुरावले नाती गोती" या झडत्या म्हणूनच पोळा हा सण साजरा करण्याची वेळ आली आहे. 
कोरोनाचं सावट व निसर्गाचा कोप या दुहेरी संकटामुळं मागील दोन वर्षांपासून आर्थिक संकटांचा सामना करत असलेला शेतकरी यावर्षी पडलेल्या समाधानकारक पावसामुळे काहीसा सुखावला आहे. यावर्षी चांगले उत्पन्न होईल ही एकच आस शेतकऱ्याला लागली आहे. शेतकऱ्याचा दैवत असलेल्या बैलांचा सण म्हणजे पोळा. आर्थिक चुणूक असतांनाही शेतकरी हा सण साजरा करतात. या दिवशी बैलांना मनोभावे सजवलं जातं. सजवटीच्या साहित्याचे भावही चांगलेच वधारले आहेत. बैलांच्या सजावटीच्या वस्तू खरेदी करतांना शेतकऱ्यांची आर्थिक कसोटी लागत आहे. तरीही वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा राजाला सजविण्यात शेतकरी कसलीही कमतरता करीत नाही. शेतीचा मुख्य आधार असलेल्या बैलांना जीवापाड जपणारे शेतकरी पोळ्याच्या सणाला त्यांची पूजा करून त्यांना गावभर फिरवितात. बैलजोडी अंगणात आली की, कुटुंबातील गृहिणी पुरणपोळी भरवून बैलांची पूजा करते, व कुटुंब प्रमुख शेतकऱ्याला शेतीकरिता मदत म्हणून थोडेफार पैसे त्यांच्या हाती घालतात. असा हा पोळ्याचा सण सर्वत्र आनंदोत्सहात साजरा केला जातो. शेतकऱ्यांचा सण म्हणून पोळा ओळखला जात असला तरी प्रत्येक घरी हा सण तेवढ्याच उत्साहात साजरा केला जातो.
शेतकऱ्यांचा जिवाभावाचा सोबती असणाऱ्या सर्जा राजाचा आज पोळा हा सण शेतकऱ्यांचा जिवाभावाचा सोबती असणाऱ्या सर्जा राजाचा आज पोळा हा सण Reviewed by सह्याद्री चौफेर on September 06, 2021 Rating: 5
Powered by Blogger.