सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील डोल–डोंगरगाव येथून राज्य महामार्गाला जोडणारा रस्ता अत्यंत निकृष्ट अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी तसेच व्यवसाय व शिक्षणाच्या निमित्ताने शहराकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या समस्येला कंटाळून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) डोल–डोंगरगाव शाखेच्या वतीने मारेगाव तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. संबंधित रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा मनसेच्या वतीने मनसे-स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या वेळी मनसे तालुकाध्यक्ष रूपेश ढोके, डोल शाखाध्यक्ष विलास गूरनले, रंगनाथ कोरांगे, पवन गूरनले, मोहन शेंडे, निखिल मोहूर्ले, सरपंच सौ. शीतल येरमे, उर्मिला नैताम, पुष्पा बोडणे, सोनाली निकोडे यांच्यासह महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.