आदिवासी बांधवांचे भजन करो आंदोलन - साेबतच जाहीर निषेध सभा

जननायक बिरसा स्मारकासाठी चंद्रपूरात आज 
सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (१९ सप्टें.) : बिरसा स्मारकाच्या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज (ता.१९ सप्टें.) ला भजन करो आंदोलन केले. या साेबतच एक निषेध सभा देखील या ठिकाणी पार पडली. अनंत चतुर्दशीचे औचित्य साधुन हे भजन करो आंदोलन करण्यात आले. जेणे करून गणपती बाप्पा जाता जाता प्रशासनाला सद्बुध्दी देऊन बिरसा स्मारकाचे प्रलंबित प्रकरण निकाली काढण्याची शक्ती प्रदान करो ! या मुळ हेतुने हे आंदोलन करण्यात आले असे, अशाेक तुमराम यांनी आमच्या प्रतिनिधीस सांगितले.
   
यावेळी ऑल इंडीया दलित पँथर सेना, चंद्रपूर यांनी आदिवासींच्या बैठा सत्याग्रहाला आपला जाहीर पाठींबा दर्शविला जाहीर निषेध सभेत अनिलभाऊ डांगे यांनी आपल्या संवेदना व्यक्त करतांना म्हणाले की ज्यांचा स्वातंत्र्य संग्रामाशी काडीचाही संबंध नसतांना त्यांचे पुतळे राजरोसपणे उभारले जातात. पण ज्यांनी प्रत्यक्षात स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती दिली (अत्यंत कोवळ्या वयात) त्या जननायकचा (बिरसा मुंडा यांचा) पुतळा उभारण्यास प्रशासनाला काय अडचण आहे? कि बहुजनांची स्मारके किंवा पुतळे उभारायचेच नाही काय ? असा खडा सवाल देखिल त्यांनी या वेळी प्रशासनास केला. जिल्हाध्यक्ष रूपेश निमसरकार म्हणाले की ज्यांच्या भरवश्यावर भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले, ज्यांनी जल, जंगल, जमीनसाठी इंग्रजांशी दोन हात केले त्या महामानव बिरसा मुंडा यांचा पुतळा चंद्रपूरात स्थापित व्हायलाच पाहिजे. जर येत्या सहा दिवसात पुतळा स्थापित झाला नाही तर, आम्ही आमचा पँथरी हिसका प्रशासनाला दाखवून देऊ. या शिवाय सभेत किशोरभाऊ पोतनवार यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. आयाेजित या निषेध सभेला मोठ्या संख्येत पँथर्स उपस्थित होते. आभार प्रदर्शनानंतर सभेची सांगता झाली. भर पावसातही ५० ते ६० आदिवासी बांधव व पँथर्स मंडप स्थळी उपस्थित होते.
               (आदिवासी बांधव व पँथर्स)

त्या नंतर परत वैशाली मेश्राम व त्यांच्या चमुंचा भजनाचा कार्यक्रम आरंभ करण्यात आला.यात विविध विषयांवरील भजने सादर करण्यात आलीत. तबल्यावर बाबुराव जुमनाके यांनी साथ दिली तर हामोनियमवर गजानन कुकडे यांनी साथ दिली. भजन मंडळीत चैताली मेश्राम, पंचकला पटले, मोनाली केदार, तमन्ना कावळे, नंदीनी कावळे, संगीता गायकवाड आदींचा समावेश होता.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी अशोक तुमराम, गोकुल मेश्राम, पुरूषोत्तम सोयाम, कैलास पाटील, रघु आत्राम, बाबुराव जुमनाके, जितेश कुळमेथे, प्रदिप गेडाम, वामन गणवीर,अशोक उईके, मनोहरराव मेश्राम, जमुना तुमराम, रंजना किन्नाके, वैशाली मेश्राम, तारा आत्राम व इतर आदिवासी बांधवांनी अथक परिश्रम घेतले.
आदिवासी बांधवांचे भजन करो आंदोलन - साेबतच जाहीर निषेध सभा आदिवासी बांधवांचे भजन करो आंदोलन - साेबतच जाहीर निषेध सभा Reviewed by सह्याद्री चौफेर on September 19, 2021 Rating: 5
Powered by Blogger.