वरोरा महसूल विभागाने जप्त केलेल्या अवैध रेतीसाठ्याचा होणार लिलाव

                        (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (१० सप्टें.) :
वरोरा महसूल विभागाने ठिकठिकाणी धाडी टाकून हस्तगत केलेला अवैध रेतीसाठा लिलावाद्वारे विकला जाणार असून इच्छुकांना तो बोली लावून खरेदी करता येणार आहे. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांनी वरोरा महसूल विभागाने धाडी टाकून ताब्यात घेतलेल्या अवैध रेती साठ्याचा लिलाव करण्याचे आदेश जारी केले आहेत. २१ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात हा लिलाव करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांनी २८ मे ला दिलेल्या निर्देशानुसार रेतीची सरासरी किंमत ११०० रुपये प्रति ब्रास ठेवण्यात आली आहे. लिलाव प्रक्रियेत ज्यांना बोली लावायची आहे, त्यांनी १० हजार रुपये अमानत रक्कम तहसील कार्यालय वरोरा येथे जमा करायची आहे. अमानत रक्कम जमा करणाऱ्यांनाच बोली लावता येणार आहे. वेगवेगळ्या रेती साठयांकरिता वेगवेगळी अमानत रक्कम जमा करावी लागणार आहे. जो जास्त रक्कमेची बोली लावेल त्यालाच रेती साठ्याचा लिलाव मंजूर करण्यात येणार आहे. ज्याची लिलावाची बोली मंजूर झाली, त्याला एकमुस्त रक्कम चालानाद्वारे शासन जमा करावी लागणार आहे. ज्यांची बोली मंजूर झाली नाही, त्यांची अमानत रक्कम परत केली जाणार आहे. प्रशासनाने दर्शविलेला रेतीसाठा त्याठिकाणी उपलब्ध आहे की, नाही याची सर्वस्वी खात्री लिलावात भाग घेणाऱ्यानेच करायची आहे. 
रेतीसाठ्याच्या लिलावात सहभागी होतांना सर्वांनी तोंडावर मास्क लावणे बंधनकारक आहे. तसेच तहसील कार्यालयात प्रवेश करतांना स्वतःला सॅनिटाईज करणे आवश्यक आहे. लिलावादरम्यान सर्वांनी सामाजिक अंतर राखण्याच्या सूचना महसूल विभागाकडून देण्यात आल्या आहे. अवैध रेतीसाठा जप्त करून बराच काळ लोटला असून हा रेतीसाठा चोरट्यांच्या रडारवर असल्याने त्याचा लिलाव करून शासनाला या रोगराईच्या काळात काही उपाययोजना करण्याकरिता थोड्याफार निधीची उपलब्धता व्हावी या हेतूने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय घेऊन रेतीसाठ्याच्या लिलाव प्रक्रियेचा प्रारंभ केला आहे.
वरोरा महसूल विभागाने जप्त केलेल्या अवैध रेतीसाठ्याचा होणार लिलाव वरोरा महसूल विभागाने जप्त केलेल्या अवैध रेतीसाठ्याचा होणार लिलाव Reviewed by सह्याद्री चौफेर on September 10, 2021 Rating: 5
Powered by Blogger.