सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेस ठरू लागल्या आहेत प्रवासाकरिता धोकादायक

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (२३ सप्टें.) : एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास हे ब्रीदवाक्य सांगणारे एसटी महामंडळच आता प्रवाशांना सुरक्षित प्रवास करविण्यात कमी पडू लागले आहे. सुखकर प्रवासाची हमी देणाऱ्या एसटी महामंडळानेच प्रवाशांच्या जीविताशी खेळ चालविला असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रवासाकरिता नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरलेली लालपरी प्रवाशांच्याच जीवावर उठू लागली आहे. एसटी महामंडळाच्या बसेस ठिकठिकाणी नादुरुस्त होऊन उभ्या तर राहतातच पण आता चालत्या बसेसचे चाकं ही निघण्यापर्यंत एसटीचा कारभार ढेपाळला आहे. काही दिवसांआधी बसचे चाकं निघण्यापासून थोडक्यात बचावले तर आज कमानीचे पट्टे तुटल्याने बसचा मोठा अपघात होण्यापासून वाचला. जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे वणी एसटी डेपोच्या दोन बसेस अपघात होण्यापासून बचावल्या आहेत. चालत्या बसेसचे चाक हालत असल्याचे एका जागृक नागरिकाच्या वेळीच निदर्शनास आल्याने त्याने बसचा पाठलाग करून बस चालकाच्या ते निदर्शनास आणून दिल्याने मोठा अनर्थ टळला. डेपोमध्ये बसचे योग्यरीत्या मेंटनन्स होत नसल्याचे हे उदाहरण आहे. 
१२ सप्टेंबरला वणी चंद्रपूर या बसचा शिवसेना युवासेना प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या सतर्कतेमुळे अपघात होण्यापासून वाचला तर आज २३ सप्टेंबरला वणी गडचांदूर या बसचे कमानीचे पट्टे तुटल्याने मोठा अपघात होण्यापासून वाचला. ब्राह्मणी फाट्याजवळ काही जागृक नागरिकांना बस एका बाजूने झुकून चालत असल्याचे आढळल्याने त्यांनी दुचाकीने बसचा पाठलाग करून चालकाला बस थांबविण्यास सांगितले. पण शेवटी बस टोल नाक्याच्या भिंतीला ठेपलीच. प्रवाशांचे नशीब बलवत्तर होते म्हणून त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ होण्यापसून वाचला असला तरी भरवशाच्या प्रवासावर आता प्रश्न चिन्ह निर्माण होऊ लागले आहे. सुरक्षेची खात्री देण्यात येत असल्याने मोठा प्रवासी वर्ग एसटी बसकडे वळला आहे. कुठल्याही प्रवासाकरीता एसटी बसलाच प्रथम पसंती दिली जाते. पण आता एसटी बसचाही प्रवास धोकादायक ठरतांना दिसत आहे. बस डेपोमध्ये बसच्या मेंटनन्सकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. बसमध्ये तांत्रिक बिघाड तर येतच आहे, पण हब ग्रीसिंग व किनपिनची कामे बरोबर होत नसल्याने बसची चाकं ही हलू लागली आहेत. हब बेरिंग तुटून चाकं डीक्ससह बाहेर फेकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामूळे बस डेपोच्या मेन्टनन्स विभागाने बसच्या मेन्टनन्सकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. सुरक्षित प्रवासाची हमी देतांना प्रवाशांच्या जिवितास धोका होणार नाही, याची काळजी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना घ्यावी लागणार आहे. या महिन्यात जागृक नागरिकांच्या सतर्कतेमुळे एसटी बसचे दोन मोठे अपघात होण्यापासून वाचले आहेत. चालक व वाहकांनीही डेपो मधून बस काढताना व मार्गातील स्टॉप घेतांना वेळोवेळी बस चेक करणे आवश्यक आहे. कारण बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी असतात. छोटीशी चुक मोठा अनर्थ घड़ऊ शकते. त्यामूळे सुरक्षित प्रवासाची हमी देतांना प्रवाशांच्या जिवितास धोका होणार नाही, याकरिता बसचे वेळोवेळी योग्य मेन्टनन्स होणे गरजेचे आहे.
सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेस ठरू लागल्या आहेत प्रवासाकरिता धोकादायक सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेस ठरू लागल्या आहेत प्रवासाकरिता धोकादायक Reviewed by सह्याद्री चौफेर on September 23, 2021 Rating: 5
Powered by Blogger.