सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या शहरानं घडविलं आहे एकजुटीचं दर्शन, ठाणेदार शाम सोनटक्के

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (०८ सप्टें.) : आगामी येणारे सण उत्सव शांततेत पार पडावे व कायदा सुव्यवस्था अबाधित राखूनच सण साजरे करावे यासंदर्भात मार्गदर्शन करण्याकरिता वणी पोलिस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार शाम सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थितीत महसूल भवन येथे शांतता समितीची सभा घेण्यात आली. यावेळी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांबरोबरच व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी व व्यापारी बांधव उपस्थित होते. तसेच सुज्ञ नागरिकांनीही या सभेला उपस्थिती दर्शविली होती.

वणी पोलिस स्टेशनमध्ये नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार शाम सोनटक्के यांचे राजकीय, सामाजिक व व्यापारी संघटनांकडून यावेळी स्वागतही करण्यात आले. ठाणेदारांनी स्वागताला उत्तर देतांना म्हटले की, मी केलेल्या उत्तम कार्यानंतर माझ्या कर्तव्यदक्षतेची पावती म्हणून माझा सत्कार झाल्यास मला जास्त आनंद होईल. यावेळी शहरातील वाहतुकीची समस्या ठाणेदारांसमोर मांडतानाच मोकाट जनावरांचाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. पोलिस स्टेशनशी संबंधित काही समस्या उपस्थित करून त्या सोडविण्याचेही राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळींकडून पोलिस निरीक्षकांना सुचविण्यात आले. काँग्रेसच्या निलीमा काळे यांनी तुमच्या योग्य कार्यास आम्ही नेहमी प्रतिसाद देऊ या वक्तव्यावर ठाणेदारांनी तुम्हा सर्वांचा प्रतिसाद मिळाल्यास हरसंभव कार्य करण्याची ग्वाही दिली.

वणी पोलिस स्टेशनचा पदभार स्विकारल्यानंतर पहिल्याच शांतता समितीच्या सभेला संबोधित करतांना ते पुढे म्हणाले की, मनुष्याची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. सर्व प्रथम सर्वांनी आधी माणुसकीला प्राधान्य दिलं पाहिजे. आपल्या शहराला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. येथील जनता ही शांतता प्रिय आहे. येथील जनतेने नेहमी एकोप्याचे दर्शन घडविले आहे. गुणा गोविंद्यानं नांदणारी येथील जनता आहे. जनतेच्या सहकार्याशिवाय कोणतेच कार्य यशस्वी होत नाही. त्यामुळे पोलिसांनाही कायदा सुव्यवस्था राखण्याकरिता जनतेचे सहकार्य मिळणे गरजेचे आहे. येणाऱ्या सणासुदीच्या काळात असाच एकोपा कायम ठेऊन मार्गदर्शक तत्वानुसार सण साजरे करण्याचे ठाणेदारांनी यावेळी आव्हान केले. श्रीमंत गरीब हा विचार मनात न बाळगता सर्वांनी एकजुटीचं दर्शन घडवावं ही रास्त अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. माणूस पैशांनी श्रीमंत होत नसतो तर त्याची विचारसरणी माणुसकीप्रधान असायला हवी. आई वडिलांनी दिलेल्या योग्य संस्कारांची प्रत्येकानेच जाण ठेवायला हवी.

 दोन दिवसांवर गणेशोत्सव असल्याने सर्वांनी शिस्तबद्धता ठेऊन शासनाच्या आदेशाचे पालन करून शांतीपूर्वक हा उत्सव साजरा करावा असे त्यांनी यावेळी सांगितले. शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलिस प्रशासन तर कटीबद्ध आहेच. पण जनतेनेही योग्य सहकार्य करण्याचे आव्हान ठाणेदार शाम सोनटक्के यांनी यावेळी केले.
सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या शहरानं घडविलं आहे एकजुटीचं दर्शन, ठाणेदार शाम सोनटक्के सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या शहरानं घडविलं आहे एकजुटीचं दर्शन, ठाणेदार शाम सोनटक्के Reviewed by सह्याद्री चौफेर on September 08, 2021 Rating: 5
Powered by Blogger.