दिवस उजाडल्यानंतरही शहरातील पथदिवे राहतात सुरूच

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (०५ सप्टें.) : नगर पालिकेचे शहराकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. नगर पालिकेकडे निधी जास्त झाला की, काय असे वाटायला लागले आहे. निधी विकास कामांवर खर्च न करता विद्युत बिलांवर उधळण्याचा नगर पालिकेने निर्धार केल्याचे दिसून येत आहे. शहरातील काही भागातले पथदिवे दिवसाही सुरूच राहत असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून अविरत पाहायला मिळत आहे. येथे विजेचे युनिट दर वाढल्याने सामान्य नागरिकांचे वीजबिल भरण्याचे वांदे होत असतांना नगर पालिका मात्र दिवसा ढवळ्याही पथदिवे सुरु ठेऊन नागरिकांना एकप्रकारे हिणवत असल्याचे दिसून येत आहे. दिवस उजाडूनही नगर पालिकेचा विद्युत विभाग निद्रिस्त अवस्थेतच रहात असल्याने काही भागातील पथदिवे दिवसभर सुरूच असतात. नगर पालिकेला वीजबिल भरावे लागत नाही काय, हे एकच वाक्य दिवसाही सुरु रहात असलेले पथदिवे पाहिल्यानंतर नागरिकांच्या तोंडून ऐकायला मिळते. नगर पालिकेने विद्युत विभागाच्या या लापर्वाहीकडे लक्ष देऊन विद्युत बिलांवर होणारा अतिरिक्त खर्च टाळण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. 

नगर पालिकेचा विद्युत विभाग विसरभोळा झाला आहे की, शहरावर जास्तच मेहरबान आहे, हेच कळायला मार्ग नाही. दिवाळी धमाका ऑफर असल्यागत दिवसाही पथदिव्यांची आरास लावून ठेवतो. नगर पालिकेकडे निधी जास्त झाला आहे की, नगर पालिकेला वीजबिलचं अदा करावे लागत नाही, ही एकच चर्चा सध्या शहरात ऐकायला मिळत आहे. शहरातील काही भागातील पथदिवे दिवसाही सुरुच असतात. मागील काही दिवसांपासून दिवसाही पथदिवे सुरुच रहात असल्याचे जास्तच पाहायला मिळत आहे. शहरातील कधी या तर कधी त्या भागातील पथदिवे दिवसाढवळ्याही सुरूच असतात. नगर पालिकेच्या विद्युत विभागाचा दुर्लक्षितपणा चांगलाच वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. जळवपास दहा दिवसांपासून पोलिस स्टेशनच्या मागील भागातील पथदिवे दिवसाही सुरु रहात असल्याने तेथील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. पोलिस स्टेशन मागील बांधकाम विभाग कार्यालय परिसरातील रोड लाईट दिवसाही सुरूच राहतात. काही दिवसाआधी प्रगती नगर, विठ्ठलवाडी या परिसरातील पथदिवे दिवसाही सुरूच राहायचे. त्यामुळे नगर पालिकेच्या विद्युत विभागाचा निष्काळजीपणा वाढत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील पथदिवे काळजीपूर्वक बंद करण्याकडे विद्युत विभागाचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. नगर पालिकेने विद्युत विभागाच्या या अनागोंदी कारभाराकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे.
दिवस उजाडल्यानंतरही शहरातील पथदिवे राहतात सुरूच दिवस उजाडल्यानंतरही शहरातील पथदिवे राहतात सुरूच Reviewed by सह्याद्री चौफेर on September 05, 2021 Rating: 5
Powered by Blogger.