Top News

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना "भारत रत्न" देण्यात यावा, गुरुदेव सेवा मंडळाची मागणी

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (०४ सप्टें.) : राष्ट्रसंतांचे विचार जनमानसात रुजविण्याकरिता व त्यांच्या समाजकार्याची समाजाला जाणीव करून देण्याकरिता शासकीय आधार मिळणे गरजेचे असल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची मागणी श्री गुरुदेव सेवा महिला व पुरुष मंडळ निळापूरच्या वतीने करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून मंडळाने ही मागणी केली आहे. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे देखील उपस्थित होते. राष्ट्रसंत टोकडोजी महाराज यांच्या समाजकार्याची व त्यांनी केलेल्या समाज प्रबोधनाची जाणीव ठेऊन तुकडोजी महाराजांना मरणोपरांत "भारतरत्न" देण्याची मंडळाने मागणी केली आहे. 

देशासाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या किंवा देशाची किर्ती जगभरात वृद्धिंगत करणाऱ्या व्यक्तीस भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी आपली उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. आतापर्यंत समाजसेवा, कला, साहित्य, विज्ञान व तंत्रज्ञान, कारखानदारी ही क्षेत्रे व सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनीही समाजकार्यात स्वतःला वाहून घेतले. समाज प्रबोधनाकरिता अख्ख आयुष्य खर्ची घातले. स्वातंत्रपूर्व काळात इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरोधात जनतेला जागृत करण्याकरिता त्यांच्यात प्रबळ विचारांनी आत्मविश्वास निर्माण करण्याचं महत्वपूर्ण कार्य तुकडोजी महाराजांनी केलं आहे. जनतेत प्रबोधनांनी विचारांचं प्राबल्य निर्माण करण्यात तुकडोजी महाराजांचं महत्वपूर्ण योगदान राहिलं आहे. एवढेच नाही तर समाजातील अनिष्ठ प्रथा, रूढी परंपरा, अंधश्रद्धा, जातीभेद-धर्मभेद, स्त्रियांवरील अत्याचार, सामाजिक अन्याय, प्रांतभेद, भाषाभेद, गरीब-श्रीमंत, कर्मकांड, स्त्री-पुरुष भेदभाव या सर्व चालीरितींवर आपल्या भजन, कीर्तन, अभंग, पोवाडे, ओवी, भाषणे यातून जनजागृती करण्याचं काम तुकडोजी महाराजांनी केलं आहे. समाजातील अज्ञान दूर करून समाजात एकी निर्माण करण्याचा ते आयुष्यभर प्रयत्न करित राहिले. याकरिता ते संपूर्ण देशभर फिरले. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जनमाणसावर एवढा प्रभाव होता की, महात्मा गांधी यांनी ३१ मार्च १९३६ मध्ये सेवाग्रामच्या आश्रमात जनजागृती करण्याकरिता तुकडोजी महाराजांना बोलावून घेतले होते. पंडित नेहरू यांच्या सोबतही मंचकावरून जनतेला प्रबोधन करण्याचे महान कार्य राष्ट्रसंतांनी केले आहे. असे हे समाज जागृती करणारे महान प्रबोधनकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या विचारांना शासकीय जोड देण्याची मागणी श्री गुरुदेव सेवा महिला व पुरुष मंडळ निळापूर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
Previous Post Next Post