सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
मारेगाव, (०४ सप्टें.) : ग्रामीण भागातील गोरगरीब तथा शहरी भागातील बहुतांश घरी सिलेंडरचे दर गगनाला भिडल्याने सिलेंडरच्या महागाई पेक्षा चुलीचा धुरच बरा म्हणत महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याकडे वळल्या असुन, रिकामा सिलेंडर अडगळीत गेला आहे.
ग्रामीण भागातील महिलांना धुरापासून मुक्ती देण्यासाठी व प्रदुषण रोखण्यासाठी सरकारने सन २०१६ मध्ये संपुर्ण देशात उज्वला गॅस योजना सुरु केली. या योजनेला ग्रामीण महिलांनी भरघोस प्रतिसाद दिल्याने अल्पवाधित योजना लोकप्रिय ठरून अनेक महिलांची धुरापासून मुक्ती झाली. आता मात्र, या योजनेच्या लाभार्थी असलेल्या गरीब कुटुंबांना गॅसच्या वाढत्या किंमती परवडणाऱ्या नसल्याने गॅस सिलेंडर अडगळीत टाकुन चुली पेटवाव्या लागल्या आहे. एकीकडे रॉकेल बंद झाले तर, दुसरीकडे गॅस महाग झाल्याने ग्रामीण महिलांची कोंडी झाली आहे.
सरकारने पंतप्रधान उज्वला योजने अंतर्गत गॅस सिलेंडर मोफत दिले. नंतरची रिफिलींग ग्राहकांना करायची होती. परंतु सिलेंडर चे दर गगनाला भिडल्याने महागाई पेक्षा धुर बरा म्हणत या महिला परत चुली वरील स्वयंपाक करण्याकडे वळल्या आहेत.
मागील जवळपास एक वर्षापासून नागरीक कोरोना संसंर्गाच्या दडपणाखाली जीवन जगत असताना टाळेबंदीला सामोरे जावे लागले. त्यातच पाऊस व बोंड अळीने शेतीचा हंगामही लवकर संपला.त्यामुळे हाताला काम नाही. अशातच खाण्याच्या तेलासह, डाळ,भाजीपाला आदिचे भाव गगनाला भिडले आहे.अशातच सिलेंडरचे दर गगनाला भिडले असताना सिलेंडर भरण्यासाठी एका वेळी एवढे पैसे जुळत नसल्याने नाईलाजाने सिलेंडर अडगळीत टाकुन ग्रामीण भागात आता गॅस ऐवजी चुलीवरील स्वयंपाकाकडे वळावे लागले.