सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (१० सप्टें.) : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेऊन गणेशोत्सवातील गर्दी टाळण्यासाठी यंदाही मिरवणुका व लहान-मोठे कार्यक्रम घेतले जाऊ नयेत. कोणीही कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोचविण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गय केली जाणार नाही असा इशारा व आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली महागांव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विलास चव्हाण यांनी फुलसावंगी येथील गणेशोत्सवाच्या बैठकी दरम्यान दिला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलसावंगी येथील गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभासद यांची बैठक घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस निरीक्षक विलास चव्हाण म्हणाले, तिसऱ्या
लाटेची भिन्नता लक्षात घेऊन शक्यतो एक गाव एक गणपती साजरा करण्याचा प्रयत्न करावा. लोक वर्गणीतून जमा होणाऱ्या निधीतून मेडिकल कॅम्प किंवा सामाजिक उपक्रम आयोजित करावेत. गणेश मंडळाची मूर्ती तीन फूट व घरगुती मूर्ती दोन फुटापेक्षा लहान असावी. सार्वजनिक गणेशोत्सवाची मंडळाची मूर्ती अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या घरी बसवावी. सर्व मंडळांनी गणेशोत्सव हा सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा.
गावातील नागरिकांनी गणेशोत्सव सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आश्वासन बैठकी दरम्यान दिले. यावेळी पोलिस उप-निरीक्षक उमेश भोसले, राहूल वानखेडे, फुलसावंगी बिटचे जमादार निलेश पेंडारकर, पोलिस नाईक बालाजी मारकड, सरपंच,
उपसरपंच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व इतर मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
"कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उत्सव काळात गर्दी होणार नाही याची मंडळांनी खबरदारी घ्यावी.
सोशल डिस्टन्सचे पालन करावे. स्वच्छतेचे नियम पाळावे. गणेशमंडळांनी दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करुन द्यावे. आदेशाचा भंग न होता उत्सव
शांततेत साजरे करण्यासाठी
सर्वांनी प्रयत्नशील राहावे."
- विलास चव्हाण
पोलिस निरीक्षक, महागांव.
गणेशोत्सवात गर्दी मिरवणूक टाळा- ठाणेदार विलास चव्हाण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 10, 2021
Rating:
