पत्नीच निघाली पतीच्या खुनाची मुख्य सूत्रधार: प्रियकराच्या मदतीने तिने पतीलाच केले ठार

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (१९ सप्टें.) : अनैतिक संबंधाच पितळ उघडं पडल्यानंतर माहेरी पाठविलेल्या पत्नीने पतीवरच सूड उगवून त्याला प्रियकराच्या मदतीने यमसदनी धाडल्याचे आता उघडकीस आले असून पोलिसांनी अगदी काही दिवसांतच या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा छडा लावून खुनाचा कट रचणाऱ्या मास्टर माईंड पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत. रासा गावशिवारात गळफास लावलेल्या अवस्थेत खाली पडलेला तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली होती. संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने अनेक तर्कवितर्क लावल्या गेले. अनेक प्रश्नही उपस्थित केल्या गेले. या मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं होतं. आत्महत्या की हत्या हा पेच पोलिसांसमोर निर्माण झाला होता. पोलिसांनी खुनाच्या दिशेने तपास सुरु केला. निलेश सुधाकर चौधरी या ३० वर्षीय युवकाच्या मृत्यूचा आव्हानात्मक तपास पोलिसांनी हाती घेऊन त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येकाचीच कसून चौकशी केली. तपासांती एक एक रहस्य उलगडत गेलं. २९ ऑगष्टला घडलेल्या या घटनेनंतर १५ दिवसांतच पोलिसांना तपासात यश आलं. योग्य तपासातून धागे जुळत गेल्याने पोलिस लवकरच काही संशयितांपर्यंत पोहचले. १६ सप्टेंबरला चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता निलेश चौधरी याच्या मृत्यूचे रहस्य उलगडले. निलेश चौधरी याला कट रचून ठार मारल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्याच्या खुनाचा कट रचणारी त्याची बायकोच असल्याचे उघड झाले. स्वतःच्याच मेव्हण्यासोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या निलेशच्या पत्नीनेच निलेशचा घात केल्याचे स्पष्ट झाले. मेव्हण्याच्या मदतीनेच तिने निलेशचा काटा काढला. मेव्हण्याशी असलेले तिचे अनैतिक संबंध डोळ्यासमोर आल्यानंतर निलेशने तिला माहेरी धाडल्याचा राग मनात धरून तिने निलेशलाच जीवनातून बाद केले. पोलिसांनी पतीच्या हत्येचा कट रचणाऱ्या या पाषाण हृदयी पत्नीला अटक केली आहे.   

तालुक्यातील रासा येथिल निलेश सुधाकर चौधरी या ३० वर्षीय युवकाचा गळफास लावून खाली पडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. २९ ऑगष्टला गावशिवारात संशयास्पद स्थितीत त्याचा मृतदेह आढळल्याने अनेक तर्कवितर्क लावल्या गेले. घातपाताचा संशय उपस्थित केल्या गेल्या. पोलिसांनी या मृत्यू प्रकरणाचा तपास हाती घेत त्याच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यास सुरुवात केली. १५ दिवसांतच पोलिसांना तपासात यश आले. चार संशयित आरोपी पोलिसांना गवसले. पोलिसांनी चौघांचीही कसून चौकशी केली. तेंव्हा हे हत्येचे गूढ बाहेर आले. निलेशच्या पत्नीचे तिचा मेव्हणा चंद्रशेखर दुर्गे याच्यावर प्रेम जडले. कालांतराने त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. नात्याने मेव्हणा लागत असल्याने त्याच्यावर व तिच्यावर कुणाचाही संशय गेला नाही. याचा फायदा उचलत त्यांची रासलीला कायम सुरु राहिली. पण शेवटी त्यांच्या अनैतिक संबंधाचा भांडाफोड झालाच. पती निलेशला त्याच्या पत्नीचे तिच्या मेव्हण्यासोबतच अनैतिक संबंध असल्याचे कळाले. आपल्या डोळ्यात धूळ झोकून आपल्या घरातच आपली पत्नी परपुरुषाशी अनैतिक संबंध ठेवत असल्याचे निलेशला कळताच त्याला चांगलाच धक्का बसला. त्याचे नंतर पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले, व त्याने पत्नीला माहेरी धाडले. पतीने माहेरी पाठवणं तिच्या चांगलच जिव्हारी लागलं. तिने आपल्या पतीचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. त्यात आपल्या प्रियकरालाही सामील करून घेतले. प्रियकर चंद्रशेखरने गावातीलच आशिष पिदूरकर, योगेश उघडे, गौरव दोरखंडे व एका विधी संघर्षग्रस्त बालकाच्या साहाय्याने निलेश चौधरी याचा गेम करण्याचा प्लॅन बनवला. घटनेच्या दिवशी त्याला बेशुद्ध होईस्तोर दारू पाजण्यात आली. नंतर त्याचा गळा आवळून त्याला ठार करण्यात आले, व त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला. या आव्हानात्मक मृत्यू प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांतच छडा लावला. आधी चार संशयितांना व दोनच दिवसांत मास्टर माईंड पत्नीला अटक करून खुनाच्या या रहस्यावरून परदा हटवला. पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृतक निलेशची पत्नी सपना हिच्या विरुद्ध खून व खुनाचा कट रचणे या अंतर्गत भादंवि च्या कलम ३०२ (३४), ३२८, २०१, २२०(ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांची जिल्हा कारागृहात रवांगी केली आहे. ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोउपनि आनंदराव पिंगळे यांनी या रहस्यमय प्रकरणाचा तपास केला.
पत्नीच निघाली पतीच्या खुनाची मुख्य सूत्रधार: प्रियकराच्या मदतीने तिने पतीलाच केले ठार पत्नीच निघाली पतीच्या खुनाची मुख्य सूत्रधार: प्रियकराच्या मदतीने तिने पतीलाच केले ठार Reviewed by सह्याद्री चौफेर on September 19, 2021 Rating: 5
Powered by Blogger.