सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (१० ऑगस्ट) : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघामध्ये समायोजन करण्याबाबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.बैठकीला सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण उन्हाळे, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, पणन महामंडळाचे संचालक सतिश सोनी, व्यवस्थापकीय संचालक सुनिल पवार, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सहकार मंत्री श्री. पाटील म्हणाले, कापूस हे राज्यातील नगदी पीक असून विदर्भ-मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतक-यांचे हित जोपासणे आवश्यक आहे. कापूस खरेदी प्रक्रियेचे योग्य नियोजन करून हमीभावाने कापूस खरेदी करण्यात येतो. शेतकऱ्यांच्या हितासाठी कापूस खरेदी प्रक्रिया अत्यंत व्यवस्थित राबवली पाहिजे.
कापूस एकाधिकार खरेदी योजना १९७२-७३ पासून राज्यात सुरू करण्यात आली होती. सन १९९९-२००० मध्ये गँट करार अस्तित्वात आल्यामुळे केंद्र शासनाने यासंबंधीच्या अधिनियमास मुदतवाढ देण्यास नकार दिल्याने २००१ एकाधिकार कापूस योजना बंद करण्यात आली. त्यामुळे महासंघ तोट्यात गेल्याने सन २०११ पासून महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघ यांचे एकत्रिकरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.
कापूस पणन महासंघाकडील अद्यावत माहितीअभावी हे प्रकरण प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असल्याने कापूस पणन महासंघाचे महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई यांच्यामध्ये समायोजन करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. महासंघाला कापूस खरेदी योजना राबविताना झालेल्या संचित तुटीचे निर्लेखन, महासंघाकडे प्रलंबित हमीशुल्क व त्यावरील व्याज यांचे पुस्तकी समायोजन करुन माफ करणे व महासंघाकडे थकित असलेले लेखापरिक्षण शुल्क माफ करणे इ.बाबत तात्काळ निर्णय घेणे आवश्यक असल्याने याबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेण्यात येईल असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या समायोजनाबाबत बैठक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 10, 2021
Rating:
